Sangli News: कवठेमहांकाळ तालुक्यात ‘म्हैसाळ’चे पाणी दाखल, शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 04:05 PM2023-03-03T16:05:43+5:302023-03-03T16:06:09+5:30
म्हैसाळेचे पाणी तालुक्यात आल्याने शेतकरी पीक पद्धत बदलून फळशेती लागवडीकडे वळला
शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यात गेल्या वर्षापासून बंद असलेली म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू झाली असून म्हैसाळ योजनेचे पाचवा टप्प्यातून पाणी सोडले आहे. गुरुवारी जाधववाडी ते कुचीपर्यंत पाणी पोहोचल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.
सध्या खरीप हंगाम जोमाने सुरू असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी द्राक्षेबाग छाटणीला सुरुवात केली आहे. उसाची नव्याने लागण करण्याची लगबग शेतकऱ्यांत सुरू आहे. म्हैसाळेचे पाणी तालुक्यात आल्याने शेतकरी पीक पद्धत बदलून फळशेती लागवडीकडे वळला आहे.
म्हैसाळ योजनेचे पाणी तालुक्यात दाखल झाल्यापासून पाटालगतच्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. परंतु अग्रणी नदीत पाणी सोडल्याशिवाय अग्रणी काठावरील शेतकऱ्यांना पाणीच मिळू शकत नाही. त्यामुळे अग्रणी काठावरील शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी अग्रणी नदीत पाणी सोडणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनीही काळजीने पाणीपट्टी भरावी, असे आवाहन म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
अग्रणीत पाणी सोडावे!
अग्रणी काठावरील शेतकऱ्यांची द्राक्षे, केळी, ऊस, हळद, मका, कांदा, लसूण, उन्हाळी भुईमूग याचबरोबर डाळींब, चिकु, पेरू, सीताफळे आदी उन्हाळ्यातील पिके जगविण्यासाठी पाण्याची गरज आहे. यामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रणी नदीत पाणी सोडावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.