कृष्णाकाठी वारणा नदीचे पाणी की चांदोली धरणाचे?; सांगलीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार की पुन्हा रेंगाळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 01:53 PM2023-11-24T13:53:38+5:302023-11-24T13:53:52+5:30
सत्तेच्या खेळात कधीही सांगलीचा पाणीप्रश्न सुटला नाही
सांगली : कृष्णाकाठी वसलेल्या सांगली शहराला शुद्ध व बारमाही मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या वारणा नदीचे पाणी आणण्याची चर्चा वारंवार होते. २००५ मध्ये ही योजना मंजूर केली. मात्र, काही वर्षांतच ही योजना रद्द झाली. आता पुन्हा याच योजनेसाठी सर्वेक्षण सुरू असताना सामाजिक कार्यकर्त्यांनी चांदोली धरणातून पाण्याची योजना देण्याची मागणी केली आहे. कृष्णेप्रमाणे वारणाही प्रदूषित झाल्याने चांदोलीचा हा पर्याय ठेवण्यात आला आहे.
सत्तेच्या खेळात कधीही सांगलीचा पाणीप्रश्न सुटला नाही. नदीच्या प्रदूषणास कारणीभूत असलेल्या शेरीनाल्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. २००५ मध्ये दिवंगत काँग्रेस नेते व तत्कालीन आमदार मदन पाटील यांच्या प्रयत्नातून वारणा उद्भव योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी त्यास मंजुरी दिली.
टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर सांगलीच्या कृष्णा नदीच्या पात्रात पाणी कमी राहणार म्हणून वारणा नदीपात्रातून पाणी उचलायचे नियोजन करण्यात आले होते. या योजनेचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले होते. २००८ मध्ये मदन पाटील यांची सत्ता जाऊन जयंत पाटील यांची महाविकास आघाडी महापालिकेत आली. त्यांनी ही योजना रद्द करून पाणी वितरण व्यवस्था मजबूत करण्याचा निर्णय घेतला.
नवीन टाक्या व ७० एम.एल.डी. प्रकल्प करण्यात आला. आता पुन्हा वारणेतून पाणी उचलण्यासाठी सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्याचवेळी नागरिक जागृती मंचने वारणेपेक्षा चांदोली धरणातून सांगलीला पाणी देण्याची मागणी केली आहे.
नवा प्रस्ताव ३०० कोटींचा
एका खासगी कंपनीने वारणा योजनेसाठी सर्वेक्षण सुरू केले असून सुमारे ३०० कोटी रुपयांचा हा प्रस्ताव असेल, असा अंदाज आहे.
काय आहे नवी मागणी ?
कोल्हापूर, सोलापूरसह राज्यातील अनेक मोठ्या शहरांना धरणातून थेट पाइपलाइन टाकून पाणी दिले आहे. त्याप्रमाणे सांगलीलाही चांदोली धरणातून थेट पाइपलाइनने पाणी द्यावे, अशी मागणी नागरिक जागृती मंचने केली आहे.
कृष्णा नदी प्रदूषित आहे म्हणून वारणेतून पाणी आणायचा बेत आखला जात आहे; पण वारणा नदीही तितकीच प्रदूषित आहे. त्याठिकाणीही अनेक गावांत दरवर्षी नदीतील मासे मरतात. म्हैसाळला नदीत मोठा बंधारा बांधण्यात येणार आहे. त्याची फुग वारणा नदीपात्रातून खोची बंधारा व कसबे डिग्रज बंधाऱ्यापर्यंत येणार आहे. मग सांगली शहरातील शेरीनाला व अन्य ठिकाणचे सांडपाणी पात्रातच साचणार आहे. या सर्व बाबींचा विचार व अभ्यास करावा. चांदोली धरणातून पाणी देण्याचा विचारही व्हावा. - सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच