Sangli: कवठेमहांकाळ तालुक्यात आले पाणी, पाणीटंचाई दूर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 03:29 PM2024-05-10T15:29:39+5:302024-05-10T15:30:48+5:30
सरपंचांची मागणी व लोकमतच्या पाठपुराव्यास यश..
महेश देसाई
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यात अग्रणी नदीला सोडलेल्या पाण्यामुळे ऐन उन्हाळ्यात अग्रणी नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला आहे. यामुळे पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. याबाबत अग्रणी नदीत पाणी सोडण्यासाठी लोकमतने दि. २० एप्रिल रोजी अग्रणी नदीकाठच्या सरपंचांच्या प्रतिक्रिया घेऊन मागणी केली होती. अखेर पाणी सोडल्यामुळे सरपंचांची मागणी व लोकमतच्या पाठपुराव्यास यश आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी लोकमतसह सरपंचांचे आभार मानले आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यात सध्या म्हैसाळ व टेंभू सिंचन योजनेचे पाणी कालवा तुडुंब भरून वाहत आहे. हा कालवा भरून वाहत असताना कवठेमहांकाळ तालुक्याची जीवनवाहिनी असलेली अग्रणी नदी कोरडी ठणठणीत पडली होती. अग्रणी काठचे सरपंच व लोकमतच्या पाठपुराव्याला यश आले असून हे पाणी काही दिवसांपूर्वी अग्रणी नदीत सोडले असून हे पाणी धुळगावपर्यंत गुरुवारी पोहोचले आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात म्हैसाळ योजना असून तालुक्यातील काही गावांना फायदा होत नव्हता. त्यामुळे या अग्रणी नदीकाठचे तहानलेले शेतकरी अग्रणी नदीत आंदोलन करताना दिसले होते. अग्रणी नदी खोऱ्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव, शिरढोण, मोरगाव, विठुरायाची वाडी, हिंगणगाव,अग्रण धुळगाव, लोणारवाडी असे गावे असून ह्या गावांच्या गावकुसातील अग्रणी नदी गेल्या कित्येक दिवसांपासून ठणठणीत असल्याने अग्रणी खोऱ्यातील गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता.
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने अग्रणी नदीत पाणी सोडले. मोरगाव, हिंगणगाव, कवठेमहांकाळ, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, लोणारवाडी या गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत ऐन उन्हाळ्यात समाधान व्यक्त होत आहे. त्याचबरोबर बंधारे भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या म्हैसाळ योजनेचे पाणी अग्रण धुळगावमध्ये दाखल झाले आहे. आता हे पाणी लोणारवाडी बंधाऱ्यात पोहोचेल. कवठेमहांकाळ परिसरातील शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता प्रशासनाने पाटबंधारे खात्याकडे अग्रणी नदीवरील बंधारे भरून मिळावेत अशी मागणी केली होती.
मागणीनुसार पाटबंधारे खात्याने सर्व्हे करून नदीकाठावरील गावांना पिण्याची व शेतीच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता बंधारे भरून घेण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे आता म्हैसाळ योजनेतून अग्रणी नदीवरील बारा बंधारे तातडीने भरण्याचे काम सुरू आहे. म्हैसाळ बंधाऱ्यात सध्या पाणी आले आहे. आता हे पाणी हिंगणगाव विठुरायाचीवाडी, धुळगाव, रांजणी, लोणारवाडी येथील अग्रणी नदीवरील बंधारे भरून घेतले जातील अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.