Sangli: अखेर कृष्णा कालव्यामध्ये तारळी धरणातून पाणी दाखल, शेतकऱ्यांच्या लढ्यास यश
By अशोक डोंबाळे | Published: March 28, 2024 12:03 PM2024-03-28T12:03:58+5:302024-03-28T12:04:18+5:30
चार तालुक्यांना एक टीएमसी पर्यंत पाणी मिळणार
सांगली : तारळी धरणातून कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यासाठी पलूसमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले. या आंदोलनाच्या लढ्याला आणि अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता तारळी धरणातून कृष्णा कालव्यात पाणी सोडले आहे. या निर्णयामुळे पलूस, वाळवा, तासगाव, मिरज तालुक्यांतील ५४ गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे.
कृष्णा कालव्याचे पाणी पलूस तालुक्यातील तुपारी ते वसगडेपर्यंत जाते. तालुक्यातील बहुतांश शेती ही आरफळ व कृष्णा कालव्यावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून आरफळ योजना व कृष्णा कालव्यात पाणी सोडले नसल्याने या भागातील शेती धोक्यात आली आहे. पाण्याअभावी सध्या ऊस, द्राक्ष, केळी, भाजीपाला, फुल शेतीसह अन्य पिके वाळली आहेत. तरीही जलसंपदा विभागाकडून पाणी सोडले जात नसल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते.
अनेकवेळा आंदोलने करुन ही अधिकारी दखल घेत नसल्याबद्दल ही शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अखेर बुधवारी सकाळी ११ वाजता तारळी धरणातून कृष्णा कालव्यात पाणी सोडले आहे. एक टीएमसी पर्यंत पाणी मिळणार असल्यामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील पलूस, वाळवा, तासगाव व मिरज तालुक्यातील १३ हजार ३६६ हेक्टर क्षेत्रातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.