कर्नाटककडे पाणी रवाना
By Admin | Published: April 25, 2016 11:24 PM2016-04-25T23:24:01+5:302016-04-26T00:46:28+5:30
सहा दिवस पाण्याचे नियोजन : पाटबंधारे विभागाची यंत्रणा सज्ज
सांगली : कमी पर्जन्यमानामुळे कर्नाटकात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातून कर्नाटकला एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारपासून राजापूर बंधाऱ्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजता पाणी मोजून सोडण्यास सुरुवात झाल्याचे व पुढील सहा दिवसात पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी सांगितले.
शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यापासून कर्नाटकातील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे कर्नाटकातील अनेक भागात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटक सरकारने कृष्णा नदीतून तीन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, धरणात असलेल्या कमी पाणीसाठ्यामुळे वारणा (चांदोली) व कोयना धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर या पाण्याचे नियोजन करण्यासाठी दोन्ही राज्यांतील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी बैठक झाली होती. यात दोन दिवसात पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येणार होते. या एक टीएमसी पाण्यासाठी कोयनेतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे सोमवारी सायंकाळपासून कर्नाटकला पाणी सोडण्याची कार्यवाही सुरु झाली.
या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकातील नारायणपूर योजनेतून एक टीएमसी पाणी अक्कलकोटसाठी सोडण्यात येणार आहे. कर्नाटकातून मात्र, अजूनही अक्कलकोटसाठी पाणी सोडण्यात आले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
अक्कलकोटला पाणी नाहीच
दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार राज्यातील पाटबंधारे प्रशासनाने यंत्रणा कामी लावत, दिलेल्या शब्दाप्रमाणे सोमवारपासून कर्नाटकला पाणी देण्यास सुरुवात केली. कर्नाटकातून अक्कलकोटला मिळणाऱ्या पाण्यासाठी मात्र प्रतीक्षा करावी लागणार आहे. याबाबत माहिती घेतली असता, अक्कलकोटला पाणी देण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
अधिकाऱ्यांच्या बैठकीतील निर्णयानुसार कर्नाटकला पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दर तासाला मोजणी करण्यात येणार असून पुढील सहा दिवसात एक टीएमसी पाणी देण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाचे अधिकारी त्याठिकाणी थांबून असल्याने पाणी सोडण्यात अडचण येणार नाही.
- हणमंत गुणाले,
अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग