कृष्णा, वारणा नद्यांची पाणीपातळी पुन्हा वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:27 AM2021-07-30T04:27:53+5:302021-07-30T04:27:53+5:30
सांगली : कोयना व वारणा धरणांमधून गुरुवारी विसर्ग वाढविण्यात आल्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ ...
सांगली : कोयना व वारणा धरणांमधून गुरुवारी विसर्ग वाढविण्यात आल्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांना घरी न परतण्याचे आवाहन महापालिका व जिल्हा प्रशासनाने गुरुवारी केले आहे.
सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांचा पूर गेल्या तीन दिवसांपासून ओसरत आहे. अनेक ठिकाणी पाणी नदीपात्रात परतले आहे. सांगली शहरात अद्याप अनेक भागांमध्ये पुराचे पाणी कायम आहे. अशा परिस्थितीत धरणांमधील विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोयना धरणातून सध्या ४८ हजार ९३१ क्युसेक, तर वारणा धरणातून १४ हजार ९८० क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीपातळीत एक ते दोन फूट वाढ होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.
सांगलीतील नदीपातळी पुन्हा ४२ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या वस्त्यांमधील नागरिकांनी घरी परतण्याची घाई करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासन व जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत गेल्या तीन दिवसांत घट होऊन पाणी इशारा पातळीच्या खाली आले होते. आता काही ठिकाणी ते पुन्हा इशारा पातळीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या भागात पाणी ओसरले होते, अशा काही भागांत पुन्हा पुराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे.
चौकट
वारणा ९१ टक्के, तर कोयना ८६ टक्के भरले
काेेयना धरण ८६ टक्के भरले असून त्यातील साठा ९०.१४ टीएमसी झाला आहे. वारणा धरणातील साठा ३१.३४ टीएमसी इतका असून, हे धरण ९१.२१ टीएमसी भरले आहे. त्यामुळे धरणांमधील विसर्ग वाढविण्यात आला आहे.
चौकट
पावसाच्या तुरळक सरी
सांगली, मिरज शहर व परिसरात गुरुवारी पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात येत्या २ ऑगस्टपर्यंत रोज मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. पावसाच्या अंदाजामुळे नदीकाठी पुन्हा धास्ती वाढली आहे.
चौकट
सांगलीत या भागांत अद्याप पाणी
सांगली शहरात कर्नाळ रोड, सूर्यवंशी प्लॉट, जामवाडी, जुना बुधगाव रस्त्याजवळील ओतात अद्याप पाणी आहे. सध्या सांगलीतील पाणीपातळी ३८ फुटांपर्यंत आली आहे. नदीपातळी ४२ फुटांवर गेली तर पुन्हा काही भागांत पाणी शिरण्याची शक्यता आहे.
चौकट
सांगलीत कृष्णा नदीची पाणीपातळी फूट
(गुरुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत)
बहे ७.६
ताकारी ३२.६
भिलवडी ३६.५
सांगली ३८.७
अंकली ४५.०७
म्हैसाळ ५६
चौकट
व्यापारी पेठांमध्ये स्वच्छता सुरूच
पूर ओसरल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी व्यापारी पेठांमध्ये स्वच्छतेचे काम सुरू होते. बहुतांश दुकाने अद्याप सुरू झालेली नाहीत. महापुराने झालेल्या नुकसानीमुळे व्यापारी पेठेत अस्वस्थता आहे.