‘कृष्णे’च्या पाणी पातळीत वेगाने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:14 PM2019-07-07T23:14:35+5:302019-07-07T23:14:45+5:30
सांगली : शहर व परिसरात रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. सकाळी पावसाचा जोर होता. काहीवेळ उसंत घेतल्यानंतर पुन्हा ...
सांगली : शहर व परिसरात रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. सकाळी पावसाचा जोर होता. काहीवेळ उसंत घेतल्यानंतर पुन्हा पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे शहरातील अनेक रस्ते चिखलमय झाले होते; तर काही चौकात पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा होत होता. दुसरीकडे नदीच्या सांगलीतील पात्रात वेगाने वाढ होत असून तीन तासात ६ फुटाने पातळी वाढली आहे.
जिल्ह्यात रविवारी सकाळपर्यंत साडेनऊ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यात मिरज तालुक्यात ७.६ मिलिमीटर, खानापूर ३, वाळवा ११.६, तासगाव ६.९, शिराळा ३४, कवठेमहांकाळ २.१, पलूस ५.५, कडेगाव १६.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर जत व आटपाडी तालुक्याला मात्र पावसाने हुलकावणी दिली आहे. शिराळा, वाळवा, कडेगाव, पलूस, तासगाव आणि मिरज तालुक्यात दिवसभर संततधार होती. पावसामुळे शहरातील रस्त्यांची वाट लागण्यास सुरुवात झाली असून, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, असे म्हणायची वेळ आली आहे. गुंठेवारीतील रस्त्यांची अवस्थाही दयनीय झाली आहे. शहरात सहा महिन्यांपूर्वीच नव्याने रस्ते करण्यात आले आहेत. या रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे. सिव्हिल चौक ते राममंदिर चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. अनेक रस्त्यांवर चिखल झाल्याने वाहनधारकांची तारांबळ उडत आहे.
पाणलोट क्षेत्रात : पावसाचा जोर कायम
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. दुपारी ४ ते सायंकाळी ७ या कालावधित सांगलीतील आयर्विन पुलाजवळ कृष्णेच्या पातळीत सहा फुटांनी वाढ झाली होती. नदीच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. सांगली बंधाराही पाण्याखाली गेला आहे.