टेंभूचे पाणी व्यवस्थापन आता 'अॅप'वर होणार, डॉ. भारत पाटणकरांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 04:09 PM2023-01-11T16:09:02+5:302023-01-11T16:09:34+5:30
पाणी आल्यानंतरही त्याचे व्यवस्थापन, पीक पद्धत, पाण्याचा ताळेबंद, पाणीपट्टी तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ॲप तयार केले जाणार
आटपाडी : टेंभूच्या बंद पाइपलाइनच्या मुख्य वितरिकेची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी आल्यानंतर त्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी पाणी वापर संस्था व शेतकऱ्याच्या मदतीसाठी अॅप तयार केले जाणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, सोपेकॉम संस्थेचे के. जे. जॉय यांनी दिली.
पाटणकर म्हणाले, समन्यायी पाणी वाटपासाठी बंद पाइपलाइनच्या पथदर्शी प्रकल्पाच्या अभ्यासासाठी शेतकरी, पाणी वापर संस्था यांच्या समन्वयातून पाणी व शेती व्यवस्थापनासाठी ॲप विकसित केले जाणार आहे. यासाठी जर्मनीच्या टीएमजी रिसर्च ग्रुपकडून लॅरिसा स्टीअम भाटिया आटपाडीत आल्या आहेत. पाणी आल्यानंतरही त्याचे व्यवस्थापन, पीक पद्धत, पाण्याचा ताळेबंद, पाणीपट्टी तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ॲप तयार केले जाणार आहे.
आनंदराव पाटील म्हणाले, तालुक्यातील शेती व शेतकऱ्यांची सर्व माहिती एकत्रित करून मॉडेल बनवले जाणार आहे. तालुक्यातील २७ हजार कुटुंबाचा, ११ हजार विहिरी, ५ हजार कूपनलिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ३ फेब्रुवारीला पुणे येथे टेंभूच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. यापूर्वी मुख्य वितरिकेची कामे सुरू होणे गरजेचे आहे. पाण्यापासून वंचित असलेली गावेही समाविष्ट करण्यात येणार आहेत.
यावेळी किरण लोहकरे, नेहा भडभडे, भीमराव यमगर, अमोल माने, अजय महारनूर, दादासाहेब वाक्षे, आनंदराव शेंडे उपस्थित होते.
फडणवीसांसोबत लवकरच बैठक
समन्यायी पाणी वाटपाच्या बंद पाइपलाइनचा पथदर्शी प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात लागू करावा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.