म्हैसाळ योजनेचे पाणी मंगळवेढा तालुक्यात पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:27 AM2021-05-21T04:27:13+5:302021-05-21T04:27:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : म्हैसाळ योजनेचे आवर्तन जून महिन्यात पाऊस सुरु होईपर्यंत सुरु राहणार आहे. यावर्षी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : म्हैसाळ योजनेचे आवर्तन जून महिन्यात पाऊस सुरु होईपर्यंत सुरु राहणार आहे. यावर्षी पाणीटंचाईमुळे ५ मार्चपासून म्हैसाळचे आवर्तन सुरु असून, पाणी जतच्या पुढे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यापर्यंत पोहोचले आहे.
मिरज पूर्व भागासह जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांंना म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे दिलासा मिळाला आहे. दरवर्षी पावसाळ्यानंतर नोव्हेंबरमध्ये म्हैसाळचे आवर्तन सुरू होते. गतवर्षी चांगल्या पावसामुळे ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत आवर्तन सुरु करुन तीन तालुक्यात ९१ टंचाईग्रस्त गावांमध्ये १५९ तलावांत पावणेदोन टीएमसी पाणी सोडण्यात आले. फेब्रुवारी अखेर उन्हाची तीव्रता वाढून पाणीटंचाई निर्माण झाल्याने मार्चपासून आवर्तन सुरु करण्यात आले आहे. म्हैसाळचे आवर्तन सुरु असल्याने दुष्काळी भागात ऐन उन्हाळ्यात पिकांना पाणी उपलब्ध होऊन शेती व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. सहा टप्प्यांत सुमारे ६५ पंपांद्धारे पाणी उपसा सुरु असून, पाणी जतच्या पुढे मंगळवेढा तालुक्यापर्यंत पोहोचले आहे. मंगळवेढा तालुक्यात चिखलगी, शेवनांदगी, बावची, जंगलगी पाऊट परिसरात म्हैसाळ योजनेच्या पाण्याची चाचणी सुरु असल्याचे म्हैसाळच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.