पाणी देण्याचे काम माझे नाही!
By admin | Published: April 19, 2016 12:05 AM2016-04-19T00:05:02+5:302016-04-19T00:57:25+5:30
तहसीलदारांचे उर्मट उत्तर : उमदीत घेराव, पत्रकारांनाही अरेरावी
उमदी : उमदी (ता. जत) येथे टॅँकरच्या मागणीसाठी तहसीलदार अभिजित पाटील यांना ग्रामस्थांनी सोमवारी घेराव घातला. ग्रामस्थांनी जाब विचारण्याचा प्रयत्न करताच तहसीलदारांनी ‘पाणी देण्याचे काम माझे नाही, ती गटविकास अधिकारी, ग्रामसेवकाची जबाबदारी आहे’, असे सांगत उध्दट वर्तन केले. यावेळी वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांना अरेरावी करीत ‘तुम्हाला कुणी निमंत्रण दिले?’ असे म्हणून कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.
उमदी परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. ४१ किलोमीटर अंतरावरील अंकलगी तलावातून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे आमचा पाणीप्रश्न सोडवा, अशी मागणी उमदी दौऱ्यावर आलेल्या तहसीलदार पाटील यांना ग्रामस्थांनी केली. मात्र ती धुडकावून लावताना ‘तुम्हाला पाणी देण्याचे काम माझे नाही, तर ते गटविकास अधिकारी, ग्रामसेवकांचे आहे’, असा अजब खुलासा करीत त्यांनी गावातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांना घेराव घातला.
यावेळी वार्तांकनासाठी आलेल्या पत्रकारांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना अरेरावी केली. कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. संतापून पत्रकारांच्या अंगावर धावून जात ‘तुम्हाला कोणी बोलावले’ असा उध्दट सवाल केला. या प्रकाराने ग्रामस्थांमधून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
निलंबित कोतवाल सोबतीला!
तहसीलदार अभिजित पाटील सोमवारी पहाटे उमदी परिसरात वाळूचे ट्रॅक्टर
पकडण्यासाठी आले होते, असे समजते. त्यांच्यासोबत दोन महिन्यांपूर्वी पत्रकारांशी हुज्जत घातल्याने निलंबित करण्यात आलेला गावकामगार कोतवाल सुभाष कोळी होता. यामुळे निलंबित कोतवालास सोबत घेऊन तहसीलदार कशी कारवाई करीत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तलाठ्याने जोडले हात!
उमदीचे तलाठी बंडगर यांना बेकायदा वाळू वाहतुकीसंदर्भातील कारवाईची माहिती विचारली असता, त्यांनी थेट हात जोडून ‘मला यातले काही विचारू नका, पाण्याचे काय ते विचारा, सगळे सांगतो’ अशी विनवणी केली. महसुली अधिकारीच हतबल असल्याने कारवाई करणार कोण, असा प्रश्
न आहे.