म्हैसाळ योजनेचे पाणी गव्हाणमध्ये दाखल, आवर्तन सुरु झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 02:27 PM2022-04-14T14:27:45+5:302022-04-14T14:28:16+5:30
सध्या म्हैसाळ योजनेमुळे या परिसरात द्राक्षशेतीचे प्रमाण वाढले आहे. ही योजना द्राक्षशेतीसाठी वरदान ठरली आहे.
गव्हाण : गव्हाण (ता. तासगाव) येथील बंधाऱ्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी दाखल झाले आहे. आवर्तन चालू झाल्याने गव्हाण, अंजनी, वज्रचौंडे, सावळज, मणेराजुरी, वडगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
म्हैसाळ योजनेच्या अंतर्गत असणाऱ्या गव्हाण विस्तारित उपसा सिंचन योजनेद्वारे मणेराजुरी, वज्रचौंडे, योगेवाडी, उपळावी, मतकुणकी या गावांना तर गव्हाण मूळ उपसा सिंचन योजनेंतर्गत अंजनी, वडगाव, नागेवाडी, डोंगरसोनी, सावळज या गावांना पाण्याचा लाभ मिळतो. सध्या म्हैसाळ योजनेमुळे या परिसरात द्राक्षशेतीचे प्रमाण वाढले आहे. ही योजना द्राक्षशेतीसाठी वरदान ठरली आहे.
सध्या परिस्थितीत द्राक्ष हंगाम संपत आला असून द्राक्ष खरड छाटणीनंतर द्राक्ष बागेत पाटाने पाणी पुरवठा करून गारवा निर्माण केला जात आहे. तसेच उन्हाळी पिकांना या पाण्याचा लाभ होत आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची पाण्यासाठी काही दिवसांपासून वारंवार मागणी होत होती. काही जणांचे पाण्याचे नियोजन कोलमडले जात असतानाच म्हैसाळ योजना कार्यान्वित झाल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे.
द्राक्ष खरड छाटणीनंतर द्राक्ष बागेला पाण्याची आवश्यकता असते. ऐन उन्हाळ्यात म्हैसाळ योजना सुरू झाल्यामुळे शेतीला व पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. - गजानन पाटील, शेतकरी, गव्हाण