रेठरे धरणामध्ये आज 'वाकुर्डे'चे पाणी, चाळीस वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 01:13 PM2022-05-03T13:13:54+5:302022-05-03T13:14:23+5:30
१९९८ मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या निर्णयानुसार वाकुर्डे बुद्रुक योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली. या योजनेमुळे कऱ्हाड, शिराळा व वाळवा तालुक्यांना फायदा होणार आहे.
मानाजी धुमाळ
रेठरे धरण : गेली चाळीस वर्षे शेतीच्या पाण्याची वाट पाहत बसलेल्या रेठरे (ता. वाळवा) येथील शेतकऱ्यांच्या शेतात आता वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे येणार आहे. या पाण्याचे पूजन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व आमदार मानसिंगराव नाईक व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या उपस्थितीत रेठरे धरण तलावात होणार आहे.
१९९८ मध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या निर्णयानुसार वाकुर्डे बुद्रुक योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली. या योजनेमुळे कऱ्हाड, शिराळा व वाळवा तालुक्यांना फायदा होणार आहे. चांदोली धरणातून डाव्या कालव्यामधून हे पाणी खिरवडे येथे उचलून ते हात्तेगाव येथून वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई तलावात सोडले आहे. तेथून हे पाणी मानकरवाडी तलावातून सायफन पद्धतीने बंदिस्त पाईपलाईनद्वारे रेड-शिराळा व रेठरे धरण, मरळनाथपूर, धुमाळवाडी, वाघवाडी परिसरात मिळणार आहे.
योजनेवर २६० कोटी रुपये खर्च
आतापर्यंत या योजनेवर २६० कोटी रुपये खर्च झाले आहेत. दुसरा फाटा रेड येथून ढगेवाडी, कापरी, जक्राईचीवाडी, शिवपुरी, लाडेगाव व इटकरे परिसरात जाणार आहे. मानकरवाडीपासून पूर्वेला चौदा किलोमीटर अंतरावर बंदिस्त पाच फूट व्यासाच्या पाईपमधून योजनेचे पाणी रेड व रेठरे धरण तलावात टाकण्यात येणार आहे. यामुळे रेठरे धरण परिसरातील ५ हजार एकर शेती पाण्याखाली येणार आहे.
५३५ मीटर लांबीचा व ५० फूट बोगदा खोदून पाणी आणले जाणार
रेड ते रेठरे धरणदरम्यान उंच भाग व खडक असल्याने पाणी उताराने वाहून येण्यासाठी रेठरे धरण येथे सुमारे ५३५ मीटर लांबीचा व ५० फूट बोगदा खोदून पाणी आणले जाणार आहे. यंदा प्रथमच शिराळाच्या पूर्वेस असणारे वाळवा तालुक्यातील या योजनेत समाविष्ट असणारे सर्व तलाव भरून घेण्यात येणार आहेत.