तासगाव पूर्वमध्ये पाण्याचे राजकारण पेटले

By admin | Published: November 19, 2015 11:43 PM2015-11-19T23:43:53+5:302015-11-20T00:20:14+5:30

विसापूर-पुणदी योजनेचे राजकारण : पाणी सोडण्यावरून पूर्व भागात संघर्षाची चिन्हे

Water politics in the east of Tasgaon erupted | तासगाव पूर्वमध्ये पाण्याचे राजकारण पेटले

तासगाव पूर्वमध्ये पाण्याचे राजकारण पेटले

Next

प्रवीण पाटील -सावळज--तासगाव पूर्व भागासाठी असलेल्या बहुचर्चित विसापूर-पुणदी या उपसा जलसिंचन योजनेला आतापर्यंत जेवढे पाणी आले, त्याच्या किती तरी पटीने जास्त या योजनेचे राजकारण करण्यात आले. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांच्या प्रयत्नाने ही योजना झाली. मात्र योजनेच्या भूमिपूजनापूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मांजर्डे येथे पाणी परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला व पूर्व भागासाठी पाणी योजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आाला. त्यावेळी खा. संजयकाका पाटीलही राष्ट्रवादीमध्ये असल्यामुळे तालुक्यात विरोधी पक्षनेत्याची भूमिका स्वाभिमानीच्या महेश खराडेंनी घेतली. त्यास शेतकऱ्यांनीही जोरदार प्रतिसाद दिला.
स्वाभिमानीच्या पाणी परिषदेनंतर आठच दिवसात राष्ट्रवादीने त्याच ठिकाणी जाहीर सभा घेऊन विसापूर-पुणदी योजनेचा व्यासपीठावरच नारळ फोडण्यात आला. अतिशय जलदगतीने या योजनेचे काम करुन आर. आर. पाटलांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या योजनेचे उद्घाटन घेऊन, पूर्व भागाच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकालात काढल्याचे जाहीर केले. या योजनेमधून सिद्धेवाडी तलाव वर्षातून तीन वेळा भरण्याची तरतूद केल्याचे सांगण्यात आले व विधानसभा निवडणुकीला या योजनेचा पुरेपूर फायदा करुन घेण्यात आला.
राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेल्यानंतर प्रारंभी विसापूर-पुणदी योजनेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या खा. संजयकाकांनी नंतर ही योजना सुरु करुन या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. परवाच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर बिरणवाडीमधून अग्रणी नदीमध्ये या योजनेचे पाणी सावळजला सोडण्यात आले. यावरुन खासदार व आमदारांनी स्वतंत्ररित्या आमच्याच प्रयत्नाने हे पाणी सोडल्याचे सांगितले. यावरून आमदार व खासदारांमध्ये या पाण्यावरून चांगलाच श्रेयवाद रंगला.
आतापर्यंत स्वाभिमानी, राष्ट्रवादी व भाजपने या योजनेचे राजकीय भांडवल करून त्याचा राजकारणासाठी पुरेपूर फायदा करुन घेतला. मात्र या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा कधी होणार? हा प्रश्नच आहे.
सिद्धेवाडी तलाव वर्षातून तीनदा भरण्याची तरतूद असूनही, ३०२ दशलक्ष घनफूट क्षमतेच्या तलावामध्ये गेल्या एका वर्षात १० दशलक्ष घनफूटही या योजनेचे पाणी आले नाही, हे या भागातील शेतकऱ्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. फक्त निवडणुकांच्या तोंडावर पाणी येते. त्यामुळे ते निवडणुकांसाठी आहे की शेतीसाठी? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. खासदार-आमदारांनी श्रेयवाद थांबवून शेतकऱ्यांना पाणी देण्याची गरज आहे.


पाण्यासाठी संघर्ष नको, समन्वय हवा
विसापूर-पुणदी योजनेचे पाणी सोडण्यावरून गेल्या काही दिवसांपासून सावळज व वायफळे येथील नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. सिद्धेवाडी तलावामधील पेड प्रादेशिक व सावळजला पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू आहेत. त्यामुळे तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. शिवाय या तलावात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांच्या उर्वरित शेतीला तरी पाणी मिळावे, ही वायफळे येथील नेत्यांची अपेक्षा आहे. तसेच सावळजलाही शेती पाण्याचा प्रश्न गंभीर असून, पाण्याची तीव्र गरज आहे. त्यामुळे वायफळे व सावळज येथील नेत्यांनी व शेतकऱ्यांनी संघर्ष न करता एकत्रितपणे समन्वयाने हा प्रश्न सोडविण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


खासदार, आमदारांनी श्रेयवाद थांबविण्याची गरज
खासदार व आमदारांनी या योजनेचा श्रेयवाद थांबवावा व एकत्रितपणे टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन ही योजना सातत्याने कशी सुरू ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून, पूर्व भागातील आठ गावांच्या योजनेतील समावेशाचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची गरज असल्याची भावना पूर्व भागातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Water politics in the east of Tasgaon erupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.