कडेगावात तोडगा :- जलसमाधी आंदोलन आश्वासनानंतर स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:42 PM2019-07-25T23:42:24+5:302019-07-25T23:44:13+5:30
अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. १५ आॅगस्टपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास २२ आॅगस्टरोजी पुन्हा जलसमाधी आंदोलन करणार आहे, असे आंदोलकांनी सांगितले.
कडेगाव : कडेगाव तलावाचा टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करावा तसेच टेंभूचे पाणी खंबाळे औंध येथून बंदिस्त पाईपलाईनद्वारे कडेगाव तलावात सोडावे, यासह अन्य मागण्यांसाठी येथील शेतकऱ्यांनी पुकारलेले जलसमाधी आंदोलन गुरुवारी आ. डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत तोडगा निघाल्याने मागे घेण्यात आले. अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. १५ आॅगस्टपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास २२ आॅगस्टरोजी पुन्हा जलसमाधी आंदोलन करणार आहे, असे आंदोलकांनी सांगितले.
येथील सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांच्यासह पन्नास शेतकºयांचा गुरुवारी सकाळी १० वाजता नाथ मंदिर येथून कडेगाव तलावात जलसमाधी आंदोलन करण्यासाठी मोर्चा निघाला. शहरातील मुख्य रस्त्याने मोर्चा जुने बसस्थानक परिसरात आला असता आ. डॉ. कदम तसेच आंदोलक व प्रशासकीय अधिकारी यांच्यात चर्चा झाली. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, नगराध्यक्षा नीता देसाई, तहसीलदार अर्चना शेटे, टेंभू योजनेचे उपकार्यकारी अभियंता नरेंद्र घार्गे, नितीश सुतार, एस. एम. पाटील उपस्थित होते. पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांनी आंदोलन रोखण्यासाठी यंत्रणा सज्ज केली होती. घार्गे यांनी वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करून आंदोलकांच्या मागणीप्रमाणे कडेगाव तलावात योजनेचे पाणी सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या बंदिस्त पाईपलाईनसाठीचा प्रस्ताव तातडीने पाठवणार असल्याचे सांगितले.
आ. डॉ. कदम म्हणाले, कडेगावच्या पाणीप्रश्नाबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा झाली आहे. शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनात उतरणार आहे.
यावर देशमुख यांच्यासह आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले व मागण्यांच्या पूर्ततेसाठी १५ आॅगस्टची अंतिम मुदत दिली. पाणीप्रश्नाबाबत अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले, तसेच कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांच्या उपास्थितीत बैठक घेणार असल्याचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले . डी. एस. देशमुख, युनुस पटेल, आनंदराव रास्कर, सुनील मोहिते, मुकुंद कुलकर्णी, संजय तडसरे, महावीर माळी, जीवन करकटे, विजय शिंदे, सुनील गाढवे, अशोक शेटे, विक्रम शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली.
जबाबदार अधिकाºयांचा बेजबाबदारपणा
पन्नास शेतकºयांनी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला असताना, आंदोलनस्थळी सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले व टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीय्यार अनुपस्थित होते. हा संवेदनशील विषय असतानाही जबाबदार अधिकारी मात्र बेजबाबदारपणे वागतात, याबाबत आंदोलकांनी संताप व्यक्त केला.