लाँचिंग प्रतीकचं, टायमिंग जयंतरावांचं; मंत्री जयंत पाटलांची मुलासाठी विधानसभेची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 04:24 PM2022-04-15T16:24:48+5:302022-04-15T16:25:30+5:30
विधानसभेचा इस्लामपूर मतदारसंघ मुलासाठी सोडला, तर खुद्द जयंतराव शेजारच्या सांगलीतून उतरतील, असं बोललं जातंय. दुसरीकडं त्यांनी थेट लोकसभाच लढवावी, असाही मतप्रवाह पुढं येऊ लागलाय.
श्रीनिवास नागे
राजकारणात वेळेत केलेलं ‘लाँचिंग’ पुढचा राजमार्ग प्रशस्त करते, असं म्हणतात. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आता चिरंजीव प्रतीक यांच्या राजकारणातील प्रवेशाची तयारी सुरू केलीय. विधानसभेचा इस्लामपूर मतदारसंघ मुलासाठी सोडला, तर खुद्द जयंतराव शेजारच्या सांगलीतून उतरतील, असं बोललं जातंय. दुसरीकडं त्यांनी थेट लोकसभाच लढवावी, असाही मतप्रवाह पुढं येऊ लागलाय.
गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रतीक पाटील सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसताहेत. स्वत:चा उद्योग सांभाळत ते मतदारसंघात फिरताहेत. वडिलांच्या माघारी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात त्यांची हजेरी ठरलेलीच. त्यांच्याकडं राज्य व्हॉलिबॉल संघटनेचं अध्यक्षपदही देण्यात आलंय. पहिल्यांदा राजारामबापू साखर कारखान्याचं अध्यक्षपद देऊन नंतर त्यांना राजकारणात उतरवलं जाईल, असं मध्यंतरी सांगितलं जात होतं. नंतर सांगली लोकसभा मतदारसंघात फिरवून जयंतरावांनी गटाची चाचपणी केली होती.
यादरम्यान राजकीय समीकरणं बदलायला लागली. दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील हे जयंतरावांचे पक्षांतर्गत स्पर्धक. आता आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित यांचा धडाकेबाज प्रवेश झालाय. कवठेमहांकाळ नगरपंचायत एकहाती ताब्यात घेताना पक्षातील आणि बाहेरील विरोधकांना चारीमुंड्या चित केल्याचं चित्र निर्माण करण्यात त्यांचे सल्लागार यशस्वी ठरलेत. त्या प्रचारावेळीच रोहित यांनी, ‘पंचविशीचा होईन, तेव्हा विरोधक संपलेले असतील,’ अशी टाळ्या वसूल गर्जना केली होती. ते आता २३ वर्षांचे आहेत, तर प्रतीक २८ वर्षांचे! रोहित २०२४ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवतीलच, असं दिसतंय. ते जिंकून विधानसभेत गेले तर त्यांची ‘सिनिअॅरिटी’ प्रतीक यांच्यासाठी भविष्यातील अडथळा ठरेल. त्यामुळे ‘उतरवलं तर आताच,’ अशी खूणगाठ बांधत जयंतरावांनी मुलासाठी तयारी सुरू केल्याचं सांगितलं जातंय.
ती वेळ आणि ही वेळ
राजारामबापूंचं निधन झालं, तेव्हा जयंतराव २४ वर्षांचे होते. आधी त्यांनी पाच-सहा वर्षे साखर कारखान्याची जबाबदारी सांभाळली आणि नंतर विधानसभेत गेले. आता त्यांनी जिल्हाभर स्वत:चा गट निर्माण केलाय. प्रतीक यांच्यासाठी इस्लामपूर हाच सुरक्षित मतदारसंघ आहे. दांडगा लोकसंपर्क, कार्यकर्त्यांचा मजबूत गट, सहकारी संस्थांचं जाळं या जोरावर आणि विरोधक कधीच एकत्र येत नसल्यानं जयंतरावांनी सातवेळा मैदान मारलंय. आता ते साठीत आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील वजनदार मंत्री आहेत. राज्यात पक्षाची हवा आहे आणि विरोधक विखुरलेत. त्यामुळं मुलाच्या राजकीय ‘लाँचिंग’साठी यासारखी योग्य वेळ ती कोणती! हे ‘टायमिंग’ साधायचं जयंतराव सोडतील का?