जलसंपदाने दबावाखाली न येता उपसाबंदी कायम ठेवावी- महापूर नियंत्रण समिती
By संतोष भिसे | Published: June 25, 2023 07:58 PM2023-06-25T19:58:52+5:302023-06-25T19:59:00+5:30
कोयनेत ३० दिवसांचाच साठा, पाऊस लांबल्यास चूळ भरायलाही पाणी मिळणार नाही
सांगली: कृष्णा नदीतील उपसाबंदी उठवल्याने कोयना धरणातील पाणीसाठा महिनाभरच पुरणार आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने सर्व दबाव झुगारुन उपसाबंदीवर ठाम रहावे असे आवाहन कृष्णा नदी महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केले आहे.
समितीतर्फे विजयकुमार दिवाण यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, उपसा सुरुच राहिल्यास संकट उद्भवेल. पाऊस लांबल्यास चूळ भरायलाही पाणी मिळणार नाही. दरम्यान, धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर घसरलेला असताना जलसंपदा विभाग मात्र उपसाबंदीविषयी धरसोड करत आहे. २३ ते २६ जूनपर्यंत उपसाबंदी आदेश जारी केला होता. तो मागे घेताना रविवारपासून (दि. २५) उपशाला परवानगी देण्यात आली. सर्व योजनांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यासाठी सांगली व साताऱ्याच्या महावितरणला कळविण्यात आले.
यावर समितीने आक्षेप घेतला आहे. दिवाण यांनी सांगितले की, कोयनेत सध्या ५.५६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. दररोज २१०० क्युसेक क्षमतेने उपशामुळे महिन्याभरात सुमारे ६३००० क्युसेक पाणी धरणातून नदीत येईल. म्हणजे ५.५० टीएमसी पाण्याचा उपसा होईल. आगामी ३० दिवस कसेबसे पाणी पुरेल. त्यानंतर मात्र धरणात खडखडाट निर्माण होणार आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस लांबला, किंवा कमी प्रमाणात झाला, तर सांगली, साताऱ्यात हाहाकार उडेल.
आठवडाभर उपसाबंदी लागू करा
समितीने म्हटले आहे की, सर्व उपसा सिंचन योजना आठवडाभर बंद ठेवाव्यात. त्यानंतर पाऊस व धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन उपसाबंदीबाबत पुढील निर्णय घ्यावा. जलसंपदा विभागाने कोणत्याही दबावाखाली न येता निर्णय घ्यावेत. नियोजन करावे. सांगली, सातारा जिल्ह्यांत पावसाला अद्याप सुरुवात झालेला नाही याचा गांभीर्याने विचार करावा.