सांगली शहरासह उपनगरात पाणी टंचाई; दोन दिवसांतून पाणी तेही गढूळ 

By अशोक डोंबाळे | Published: February 26, 2024 03:43 PM2024-02-26T15:43:29+5:302024-02-26T15:43:50+5:30

नागरिकांची खासगी जलशुद्धीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्यासाठी गर्दी

Water scarcity in suburbs including Sangli city | सांगली शहरासह उपनगरात पाणी टंचाई; दोन दिवसांतून पाणी तेही गढूळ 

सांगली शहरासह उपनगरात पाणी टंचाई; दोन दिवसांतून पाणी तेही गढूळ 

सांगली : कृष्णा नदीतच अपुरा पाणीसाठा असल्यामुळे सांगली शहराला अपुरा आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. सांगलीतील घन:शामनगर, विकासनगर, चिंतामणीनगर परिसराला तर गेल्या दोन दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. तोही पाणीपुरवठा एक दिवसाआड एक दिवस पाणी येत आहे. दोन दिवसांतून मिळणारे पाणीही पुरेशा दाबाने होत नसल्यामुळे नागरिकांच्या घरावरील पाण्याच्या टाक्या रिकाम्याच राहिल्या आहेत. नागरिकांना गेल्या २० वर्षांत प्रथमच तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे.

मार्च, एप्रिल महिन्यापूर्वीच उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यातच सांगली शहराच्या उपनगरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सांगली शहरापासून जवळच असलेल्या घन:शामनगर, विकासनगर, वसंतदादा कारखाना परिसर, पंचशीलनगर, राजनगर, संजयनगर, चिंतामणीनगर, कलानगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

महापालिकेकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे; पण तोही दूषित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. घरातील पाण्याच्या टाक्याही रिकाम्या झाल्यामुळे विकतचे पाणी नागरिकांना घ्यावे लागत आहे. पिण्यासाठी तर खासगी जलशुद्धीकरण केंद्रावरून नागरिक पाणी विकतचे घेत आहेत. तरीही या परिसरातील लोकप्रतिनिधी फिरकत नसल्याबद्दल नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

नागरिकांवर विकतचे पाणी पिण्याची वेळ

घन:शामनगर, चिंतामणीनगर, राजनगर, विकासनगर, पंचशीलनगर, वसंतदादा कारखाना परिसरात दोन दिवसांतून पाणीपुरवठा होत आहे. तोही पाणीपुरवठा गढूळ होत असल्यामुळे नागरिकांना खासगी जलशुद्धीकरण केंद्रावरुन पिण्यासाठी पाणी विकतचे आणावे लागत आहे. खासगी जलशुद्धीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे. महापालिकेकडून शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

पाणीपुरवठा विभागाचा सावळा गोंधळ

घन:शामनगर, चिंतामणीनगर, राजनगर परिसराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पाणी टंचाईबद्दल विचारणा केली. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी पाणी टंचाई असल्यामुळे एक दिवसाआड एक दिवस पाणीपुरवठा होत आहे. पाणी अशुद्ध पुरवठ्याबद्दल आम्हालाही काहीच कल्पना नसल्याचे सांगण्यात आले.

खासदार, आमदारांचेही दुर्लक्ष

शहरातील नागरिक पाण्यासाठी भटकंती करत असताना खासदार संजय पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही पाणी टंचाईवर काहीच उपाययोजना केल्या नाहीत, असाही नागरिकांमधून आरोप होत आहे. याकडे लोकप्रतिनिधी लक्ष घालणार की नाही, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Water scarcity in suburbs including Sangli city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.