शिराळा तालुक्यात पाणी टंचाई
By admin | Published: December 7, 2015 11:47 PM2015-12-07T23:47:18+5:302015-12-08T00:45:09+5:30
पिकचेही नुकसान : पाणी साठ्याने तळ गाठला
सहदेव खोत-- पुनवत --शिराळा तालुक्यात नोव्हेंबर संपण्याआधीच तलाव, छोटी-मोठी धरणे यातील पाणीसाठा कमालीचा कमी होत आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्याला बराच अवधी असतानाच शिराळा तालुकावासीयांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. पाण्याच्या समस्येबरोबरच भागातील शेतकऱ्यांना आता पीक, पशुधन जगविण्यासाठी मोठे कष्ट सोसावे लागणार आहेत.तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला आहे. परिणामी पाणीसाठे पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. तालुक्यात सुमारे ५३ तलाव व लहान-मोठी धरणे आहेत. दरवर्षी हे तलाव, धरणे पावसामुळे भरत असतात. मात्र यावर्षी विचित्र चित्र पाहावयास मिळत आहे.
आता चक्क नोव्हेंबरमध्येच परिसरातील अनेक गावांतील तलाव कोरडे पडले असून पाण्याने तळ गाठला आहे. नोव्हेंबरमध्ये पाण्याची अशी परिस्थिती निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत पुरणारे पाणीसाठे आताच कोरडे पडले आहेत.
पाणीसाठे कोरडे पडल्याने जनावरांच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न तीव्र बनत चाललेला आहे, तर शेतीला मोठा फटका बसण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्यांना आता केवळ वारणा व मोरणा नदीच्या पाण्यावरच शेती पिकविण्याच्या आशा उरल्या आहेत.
कमी पावसामुळे भुईमूग, ज्वारी, सोयाबीन, पावटा आदी पिकांचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले आहे. तसेच सध्या उपलब्ध असलेली पिके लाभतीलच याची शाश्वती शेतकऱ्यांना नाही. त्यामुळे तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेकऱ्यांकडून होत आहे.
संकट वीज टंचाईचेही
तालुक्यात कमी पावसामुळे उपलब्ध पाणीसाठा जास्त काळ पुरविण्यासाठी वीज कपात होणार असून शेतीसाठी काही तासच वीज मिळणार आहे. त्यामुळे पाण्याबरोबरच वीज टंचाईचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागणार असल्याचे चित्र आहे