उत्तर-पूर्व कर्नाटकात पाणीटंचाई, कर्नाटकने महाराष्ट्राकडे मागितले ६ टीएमसी पाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 12:08 PM2023-06-01T12:08:37+5:302023-06-01T12:09:09+5:30
अधिकारी म्हणतात, आम्हाला काहीच माहिती नाही!
सांगली : उत्तर-पूर्व कर्नाटकातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे कृष्णा नदीतून तीन आणि भीमा नदीतून तीन टीएमसी पाणी सोडावे, अशी विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बुधवारी केली. पाणी देण्याबाबत महाराष्ट्राने अद्याप कोणताही प्रतिसाद कर्नाटकला दिला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले की, उत्तर-पूर्व कर्नाटकातील बेळगाव, विजयपूर, बागलकोट, कलबुर्गी, यादगिरी आणि रायचूर जिल्ह्यातील गावांमध्ये तीव्र उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. मार्च महिन्यापासूनच टंचाई असल्यामुळे पाण्याची नितांत गरज आहे. नागरिकांच्या आणि पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून वारणा (चांदोली) आणि कोयना धरणातून कृष्णा नदीत तीन टीएमसी आणि उजनी जलाशयातून भीमा नदीत तीन टीएमसी पाणी सोडण्याची विनंती कर्नाटक सरकारने यापूर्वीच केली आहे.
महाराष्ट्र सरकारने या मागणीचा विचार करून मेच्या पहिल्या पंधरवड्यात एक टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडले आहे. कर्नाटकातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये तीव्र उन्हाळा अजूनही कायम आहे. या जिल्ह्यांतील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असल्याने, पशुधन आणि घरगुती वापरासाठी पाण्याची गरज आहे. उत्तर कर्नाटकामध्ये अद्याप मान्सून सुरू झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने वारणा आणि कोयना धरणातून दोन टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडण्याची गरज आहे. सोबत तीन टीएमसी पाणी उजनी जलाशयातून भीमा नदीत सोडावे. पाणी सोडण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने सूचना द्याव्यात.
अधिकारी म्हणतात, आम्हाला काहीच माहिती नाही!
कर्नाटक सरकारने पाणी सोडण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. याबाबत सांगलीच्या जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कर्नाटकसाठी पाणी सोडण्याबाबत आम्हाला कोणतीही सूचना नाही. शिवाय सध्या कोयना आणि वारणा धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. आपल्या दुष्काळी तालुक्यांसाठीच्या पाणी योजना सुरू ठेवण्यासाठी पाणी कमी पडत आहे.