'जलसंपदा, महापालिकेच्या निष्क्रियतेमुळेच सांगलीत पाणी टंचाई'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 06:43 PM2023-03-11T18:43:41+5:302023-03-11T18:43:59+5:30
प्रदूषण अधिकारी गप्प का ?
सांगली : कोयना धरणात सध्या ६७ टीएमसी पाणीसाठा असतानाही केवळ जलसंपदा आणि महापालिका प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळे सांगली शहरातील नागरिकांवर पाणी टंचाईचे संकट आले आहे, असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच अधिकाऱ्यांच्या या निष्क्रियतेबद्दल त्यांना जाब विचारण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील आणि सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण म्हणाले की, पाणी नसल्यामुळे कृष्णा नदीचे पात्र सध्या कोरडे पडले आहे. नदीचे सध्याचे पात्र हे केवळ महापालिका आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये काहीही समन्वय नसल्यामुळेच कोरडे पडले आहे. कोयना धरणात सध्या पाणीसाठा ६७ टीएमसी आहे. जवळपास ६१ टक्के पाणीसाठा आहे. वारणेमध्ये २६ टीएमसी पाणी आहे. असे असताना सांगलीकरांना मात्र आता आठ दिवस दूषित पाणी प्यावे लागत आहे.
कऱ्हाड ते सांगलीपर्यंत गटारी, कारखाना मळी, औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे दूषित पाणी थेट नदीत मिसळत आहे. हेच दूषित पाणी सांगलीकरांना प्यावे लागत आहे. यामुळे अनेक आजाराचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. याला महापालिका अधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचा फटका जनतेला बसत आहे. या सर्वांचा प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्याची गरज आहे. तरीही लोकप्रतिनिधी त्याकडे लक्ष देत नसल्यामुळे जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे.
कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सांगलीच्या दूषित पाण्याबाबत तक्रार केली आहे. कृष्णा नदीतील पाण्याबाबत कोयना धरणातील अधिकाऱ्यांशी जलसंपदा आणि महापालिका अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवला पाहिजे, अशी मागणीही केली आहे. यावेळी बैठकीला विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, संजय कोरे, सतीश रांजणे, आदी उपस्थित होते.
प्रदूषण अधिकारी गप्प का ?
कृष्णा आणि वारणा नद्यांच्या दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना यापूर्वी कृष्णा नदीच्या दूषित पाणी आणि मृत माशाबद्दल जाब विचारला होता. तरीही त्यांच्याकडून दूषित पाण्यास जबाबदार कारखाने आणि महापालिकेवर कारवाई होत नाही, असा आरोपही कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केला आहे.