कर्नाटक सीमाभागात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:04 AM2019-04-26T00:04:46+5:302019-04-26T00:04:50+5:30
मिरज : कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडल्याने सीमाभागातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, कोयना धरणातून पाणी सोडण्याची ...
मिरज : कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडल्याने सीमाभागातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राजापूर बंधाऱ्यातून पाणी सोडण्याच्या कर्नाटक जलसंपदा विभागाच्या मागणीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने, अथणी व कागवाड तालुक्यातील ग्रामस्थ हवालदिल आहेत.
शिरोळ तालुक्यातील राजापूर येथील बंधाºयापुढे कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडली आहे. येथे तीव्र पाणीटंचाईमुळे कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी कर्नाटक पाटबंधारे विभागाने महाराष्टÑ जलसंपदा विभागाकडे केली आहे. महाराष्टÑात दूधगंगा धरण बांधताना, कर्नाटकाला उन्हाळ्यात पाणी देण्याचा करार केला आहे. गतवर्षी कोयना व वारणा धरणातून कर्नाटकाला पाणी सोडण्यात आले होते. यावर्षीही सीमाभागात पाणीटंचाई आहे. तसेच कोयना धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने केली आहे. कर्नाटकच्या मागणीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकातून जत व अक्कलकोट तालुक्यात पाणी देण्यात येणार आहे. कर्नाटकात उगार व कुडची येथे नदीपात्रात पाण्याचा खडखडाट असल्याने, नदीच्या दोन्ही काठावरील कुडची, उगार, जुगुळ, शिरगुप्पी, ऐनापूर, कृष्णाकित्तूर यांसह अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कृष्णा नदीवरील हिप्परगी धरणातील पाण्याने तळ गाठल्याने जमखंडी व बागलकोट परिसरात पाणीटंचाई आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. म्हैसाळ, ताकारी व टेंभू योजनेसाठी कृष्णा नदीचे पाणी अडविण्यात आले असून, सांगली जिल्ह्यात सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर सुरू असताना, कर्नाटक हद्दीत अथणी व कागवाड तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे.
लोकसभा निवडणूक प्रचारात भाजप व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी महाराष्टÑातून कोयना धरणातून पाणी मिळविण्याची घोषणा केली होती. सर्व राजकीय पक्षांनी पाण्याचे राजकारण न करता, महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी मिळविण्याचा प्रयत्न करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. महाराष्टÑातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने, पाणी टंचाईने त्रस्त सीमाभागातील ग्रामस्थ हवालदिल आहेत.
टँकरसाठीही पाणी नाही
नदी पूर्णपणे कोरडी असल्याने अथणी व कागवाड तालुक्यात ७८ गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून, ३२ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकर भरण्यासाठीही पाणीसाठा उपलब्ध नसल्याने प्रशासन चिंतेत आहे. उगार, ऐनापूर, कृष्णा-कित्तुर यासह अनेक गावांत टँकरने प्रदूषित पाण्याचाच पुरवठा करण्यात येत आहे.