Sangli: चांदोलीतील पाणीसाठ्यात चार महिन्यात १३ टीएमसीने घट, तालुक्यातील पाच पाझर तलाव कोरडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:23 PM2024-03-07T12:23:49+5:302024-03-07T12:24:24+5:30
गतवर्षीपेक्षा ५ टीएमसी कमी पाणी
विकास शहा
शिराळा : चांदोली (ता. शिराळा) धरण पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाल्याने ३ ऑक्टोबर राेजी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे बंद करण्यात आले होते. यानंतर धरणातून वीजनिर्मिती केंद्र तसेच कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडण्यात येत हाेते. परिणामी गेल्या पाच महिन्यात धरणातील पाणीसाठा १३ टीएमसीने घटला आहे. गतवर्षीपेक्षा यंदाचा पाणीसाठा ३ टीएमसीने कमी आहे.
सध्या केवळ वीजनिर्मिती केंद्रातून १५८५ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये कालव्यांमध्ये ३५० क्यूसेक तर वारणा नदीत १२३५ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात केवळ १४.५८ टीएमसी (५२.९७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी दिली होती. यामुळे १ ऑक्टोबर राेजी चारही वक्राकार दरवाजे उघडले होते. पावसाने उघडीप दिल्यानंतर ३ ऑक्टोबरला हे दरवाजे बंद करण्यात आले. यानंतर केवळ वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू होता. गेल्या पाच महिन्यात १३ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. यावर्षी या धरण परिसरात आजअखेर १८८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
चांदाेली धरणाची पाणी साठवण क्षमता ३३.४० टीएमसी असून सध्या पाणीसाठा २१.४६ टीएमसी (६२.३८ टक्के) तसेच उपयुक्त साठा १४.५८ टीएमसी (५२.९७) आहे. गेल्या पाच महिन्यात १३ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षी हा साठा २१.४३ टीएमसी होता. म्हणजे यावर्षी २.९५ टीएमसी कमी आहे.
मोरणा धरणातून शेतकऱ्यांना पाणी द्यावे तसेच औद्योगिक वसाहतीला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करावी अशी मागणी होत आहे.
मोरणा धरणात सध्या ३२ टक्के तर कार्वे व रेठरे धरण तलावात २० टक्के पाणीसाठा आहे. तालुक्यातील पाच पाझर तलाव कोरडे पडले आहेत. इतर तलावातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. वाकुर्डे योजनेचे पाणी सोडल्याने करमजाई धरण व हत्तेगाव, रेड, बेलदारवाडी, इंग्रुळ तलाव ९० टक्के भरले आहेत. ३३० कूपनलिकांच्या पाणी पातळीत घट झाली आहे.
आजची स्थिती
- एकूण क्षमता ३४.४० टीएमसी
- धरण पाणीसाठा : २१.४६ टीएमसी (६२.३८ टक्के)
- उपयुक्त पाणीसाठा : १४.५८ टीएमसी (५२.९७ टक्के)
- एकूण पाऊस : १८८९ मिलिमीटर
विसर्ग
- वीजनिर्मिती केंद्रातून : १५८५ क्यूसेक
- कालव्यामध्ये : ३५० क्यूसेक
- नदीपात्रात : १२३५ क्यूसेक