मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठ्याच्या हालचाली
By admin | Published: April 4, 2016 12:22 AM2016-04-04T00:22:15+5:302016-04-04T00:24:52+5:30
दुष्काळी उपाययोजना : रेल्वेच्या पाणीपुरवठा योजनेच्या अधिग्रहणाची शक्यता
मिरज : तीव्र पाणीटंचाईमुळे मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याबाबत विचार सुरू आहे. यासाठी प्रशासनाकडून मिरजेतील रेल्वेच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे अधिग्रहण करण्यात येण्याची शक्यता आहे.
यंदा भीषण दुष्काळामुळे मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाईमुळे लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला आहे. सोलापुरातून दररोज रेल्वे टँकरने लातूरला पाणी नेण्यात येणार आहे. मात्र, सोलापुरात पाण्याची उपलब्धता कमी असल्याने पाणी उपलब्ध असलेल्या मिरजेतून पाणीपुरवठ्याचा पर्याय आहे. मध्य रेल्वेची मिरजेत रेल्वेस्थानकासाठी कृष्णा नदीतून स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना आहे. दररोज ४५ लाख लिटर पाणी उपसा शुद्धिकरण क्षमता असलेल्या योजनेतून रेल्वेस्थानक व रेल्वे कर्मचारी वसाहतीला पाणीपुरवठा करण्यात येतो. दहा वर्षांपूर्वी रेल्वेने ७ कोटी रुपये खर्चून कृष्णाघाट ते रेल्वेस्थानकापर्यंत साडेचार किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीद्वारे रेल्वेस्थानकाजवळ पाणी शुद्धिकरण व वितरण यंत्रणा उभारली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात केवळ मिरजेतच रेल्वेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. मिरजेत दररोज येणाऱ्या व जाणाऱ्या ६५ लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस व पॅसेंजर रेल्वेत पाणी भरण्यात येते. मिरजेत रेल्वे व कर्मचारी वसाहतीसाठी दररोज १० लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. सुमारे ४५ लाख लिटर क्षमतेच्या रेल्वेच्या पाणी पुरवठा योजनेतून दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करता येणे शक्य असल्याने मिरजेतून लातूरला रेल्वे टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रस्ताव आहे. यासाठी प्रशासनाकडून मिरजेतील रेल्वेच्या पाणी योजनेच्या अधिग्रहणाची शक्यता आहे.
मिरजेतून लातूर ३४३ किलोमीटर एवढ्या अंतरावर असल्याने मिरजेतून लातूरला पाणी पोहोचविण्यासाठी सात तास लागणार आहेत. लातूरसह पाणीटंचाई असलेल्या अन्य ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी मिरजेतील रेल्वे पाणीपुरवठा योजनेचा वापर करण्यात येणार आहे. वारणा व कोयना धरणातून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने उन्हाळ्यात दोन महिने पुरेल एवढा पाणी साठा मिरजेत आहे. म्हैसाळ योजनेव्दारे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने लगतच्या कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पिण्याच्या व शेतीसाठी पाणी टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. मिरजेतून दररोज दोन रेल्वे टँकरने लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची तयारी आहे.
वित्तीय तूट मर्यादेतच
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणी करमाळा किंवा पंढरपूर रेल्वेस्थानकातून लातूरला नेण्यासाठी तांत्रिक अडचणी आहेत. यासाठी धरणापासून रेल्वेस्थानकापर्यंत जलवाहिनीची व्यवस्था करावी लागणार असल्याने पंढरपुरातून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या मिरजेतून रेल्वेने तातडीने व शुद्ध पाणीपुरवठा सुरू करता येणे शक्य आहे. भाजप नेते मकरंद देशपांडे यांनी मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.