सांगलीकरांनो पाणी जपून वापरा; मिरज, कुपवाड शहरांना आता दिवसातून एकवेळच पाणीपुरवठा

By संतोष भिसे | Published: June 24, 2023 03:46 PM2023-06-24T15:46:49+5:302023-06-24T15:54:22+5:30

कृष्णा नदीतून पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगांसाठी पाणी पुरवताना जलसंपदा विभागाला कसरत करावी लागत आहे

Water supply to Sangli, Miraj, Kupwad cities now only once a day | सांगलीकरांनो पाणी जपून वापरा; मिरज, कुपवाड शहरांना आता दिवसातून एकवेळच पाणीपुरवठा

सांगलीकरांनो पाणी जपून वापरा; मिरज, कुपवाड शहरांना आता दिवसातून एकवेळच पाणीपुरवठा

googlenewsNext

सांगली : लांबलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या टंचाईस्थितीचे थेट परिणाम आता नागरिकांना भेडसावू लागले आहेत. सांगली, मिरज व कुपवाड  शहरांना दिवसातून आता एकदाच पाणी पुरविले जाणार आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

सांगलीचा पाणीपुरवठा कोयना धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. सध्या धरणात ५.६५ टीएमसी इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, धरणातून कृष्णा नदीतील विसर्ग कमी करण्यात आल्याने  पाणीपातळी खालावली आहे. पर्जन्यमान व परिस्थितीनुसार महापालिकेला पाणीपुरवठयाचे नियोजन करावे लागत आहे. धरणातील मर्यादीत पाणीसाठ्याचा विचार करुन पाणीपुरवठा सुरु आहे.

सांगली, मिरज व कुपवाड शहरांतील काही भागात चोवीस तास पाणीपुरवठा सुरु असतो, तर काही भागात दोनवेळा सोडण्यात येते. पण सध्या टंचाईस्थितीमुळे एकदाच पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होईपर्यंत, तसेच कोयना धरणात पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत  एकवेळ पाणी सोडले जाणार आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने, उकळून व गाळून प्यावे.

दरम्यान, कृष्णा नदीतून पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगांसाठी पाणी पुरवताना जलसंपदा विभागाला कसरत करावी लागत आहे. कोयना धरणातील पाणीसाठा निचांकी पातळीवर घसरलेला असतानाच, पावसाचीही चिन्हे नाहीत. त्यामुळे सांगलीकरांना पाण्याची चैन काही दिवसांसाठी थांबवावी लागणार आहे. आजवर अवर्षणस्थितीत शहरांचा पाणीपुरवठा सहसा नियंत्रित करावा लागलेला नव्हता. सध्या मात्र उपशावर मर्यादा आल्या आहेत.

गटारीला जाणारे पाणी रोखा

सागंली, मिरजेत अनेक ठिकाणी नळांना तोट्या नाहीत. पाणीपुरवठा सुरु होतो, तेव्हा धो-धो पाणी गटारांतून वाहून जात असते. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांच्या गळतीमुळेही रस्त्या-रस्त्यावरुन पाण्याचे लोंढे वाहत असतात. ही नासधूस थांबविण्याची वेळ आली आहे

Web Title: Water supply to Sangli, Miraj, Kupwad cities now only once a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.