टेंभूचे पाणी पूर्ण क्षमतेने आले , पृथ्वीराज देशमुख : तलावामध्ये पाणी पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:29 PM2018-03-06T23:29:58+5:302018-03-06T23:29:58+5:30
कडेपूर : कडेगाव तालुक्यातील शेतीला पाणी देऊन शेतकºयांच्या जीवनात नंदनवन फुलविण्याचे स्वप्न आमदार संपतराव देशमुख यांनी पाहिले होते. सध्या तालुक्यात ताकारी आणि टेंभू योजनेचे पाणी शेतीसाठी पूर्ण क्षमतेने आले आहे.
कडेपूर : कडेगाव तालुक्यातील शेतीला पाणी देऊन शेतकऱ्यांच्या जीवनात नंदनवन फुलविण्याचे स्वप्न आमदार संपतराव देशमुख यांनी पाहिले होते. सध्या तालुक्यात ताकारी आणि टेंभू योजनेचे पाणी शेतीसाठी पूर्ण क्षमतेने आले आहे. खऱ्या अर्थाने आज संपतराव देशमुख यांचे स्वप्न साकार झाले आहे, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी केले.
येतगाव (ता. कडेगाव) येथील हेळाचा माळ तलावात सोडण्यात आलेल्या टेंभू योजनेच्या पाण्याचे पूजन पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती मंदा करांडे, जिल्हा परिषद सदस्या रेश्मा साळुंखे, सी. एम. बायो अॅग्रो कंपनीचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, सरपंच साहेबराव उथळे उपस्थित होते.
यावेळी देशमुख म्हणाले, दुष्काळी भागातील शेतीला पाणी मिळण्यासाठीच टेंभू योजनेचा जन्म संपतराव देशमुख यांच्या कार्यतत्पर नेतृत्वातून झाला. मात्र, काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकºयांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. आता केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे. सर्व पाणी योजना पूर्ण करण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी देण्याचे काम करीत आहे.
ते म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती आपल्या ताब्यात आहेत. या माध्यमातून येतगावमधील विकासकामासाठी एका वर्षात दोन कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून दिला. येरळा नदीवर बंधारा, सिमेंट नाला बांध, दलितवस्ती सुधारणा, शाळा खोल्यांची दुरुस्ती, सौर दुहेरी पंप, स्ट्रीट लाईट, आदी कामे मंजूर केली आहेत. गावच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
यावेळी भाजपा नेते डॉ. आबासाहेब साळुंखे, जगदीश महाडिक, नेवरीचे माजी सरपंच संतोष महाडिक, कृृष्णात मोकळे, लक्ष्मण माने, नवनाथ पोळ, शंकर सावंत, संतोष सावंत, मारुती जरग यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. केन अॅग्रो साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण कणसे यांनी स्वागत केले. रामचंद्र कणसे यांनी आभार मानले.