ऐन पावसाळ्यात जतला टँकरने पाणी

By admin | Published: June 23, 2015 12:03 AM2015-06-23T00:03:46+5:302015-06-23T00:03:46+5:30

बारा टँकर सुरू : आणखी चार गावांची मागणी; ग्रामस्थांची भटकंती सुरूच

Water tanker gets water during monsoon | ऐन पावसाळ्यात जतला टँकरने पाणी

ऐन पावसाळ्यात जतला टँकरने पाणी

Next

जयवंत आदाटे - जत -तालुक्यातील दहा गावे आणि त्याखालील ७६ वाड्या-वस्त्यांवरील ३९ हजार ७४९ नागरिकांना बारा टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ऐन पावसाळ्यात केला जात आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी आणखी चार गावांतील नागरिकांनी केली आहे. यापुढील काळात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर टँकरच्या संख्येत आणखी वाढ करावी लागणार आहे.
सर्वत्र पावसाळा सुरु होऊन समाधानकारक पाऊस झाला आहे. जत तालुक्यात फक्त ढगाळ वातावरण आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे अधून-मधून कधीतरी तुरळक प्रमाणात पाऊस पडून ओली झालेली जमीन सुकून जात आहे. सकाळी व सायंकाळी हवेत गारवा जाणवत आहे, तर दुपारी उष्णता वाढत आहे. त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे.
उमराणी, खोजानवाडी, डफळापूर, अमृतवाडी, काराजनगी, सिंदूर, उटगी, बिळूर, हळ्ळी, सुसलाद या दहा गावांना प्रति दिवस माणसी वीस लिटर या प्रमाणात एक लाख ४४ हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. डफळापूर गावची लोकसंख्या सुमारे पाच हजार आहे. सध्या येथे २४ हजार लिटर क्षमता असलेल्या एका खासगी टँकरच्या तीन खेपा करुन पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु यातून मिळणारे पाणी कमी पडत आहे. शासनाने आणखी एक टँकर द्यावा, अशी मागणी जत पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब यांनी केली आहे. प्रशासनाने येथील जादा टँकर मागणीचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविला आहे.
बेवनूर गावातील नागरिकांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी जत पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे केली होती. त्यांनी प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी तहसीलदार, जत यांच्याकडे पाठविला आहे. परंतु त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. शासनाने आमचा टँकर त्वरित मंजूर करुन येथे टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम नाईक यांनी केली आहे.
सोन्याळ व जाडरबोबलाद गावात आणि परिसरातील पाणी उद्भव कमी झाला आहे. शासनाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत सादर करण्यात आला आहे. या दोन गावांचे सर्वेक्षण करून तेथील टँकर मागणीचे प्रस्ताव तहसील कार्यालयास सादर करावेत, अशी मागणी जि. प. सदस्या सुशिला व्हनमोरे यांनी केली आहे.
प्रत्येकवर्षी होणारा अनावश्यक खर्च कमी करून शासनाने जत तालुक्याला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करून त्यातून पाणी सोडले, तर येथील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार आहे.


कोट्यवधीचा खर्च, तरी टंचाई कायम
एकूण बारा टँकरमध्ये चार शासकीय व आठ खासगी टँकरचा समावेश आहे. बारा टँकरसाठी प्रतिदिवस ३१ खेपा पाणी मंजूर करण्यात आले आहे. परंतु वीज दाबनियमन, नादुरुस्त टँकर व इतर तांत्रिक कारणांमुळे काहीवेळा खेपांची संख्या कमी होत आहे. १७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करुन, पाणीटंचाई जाणवत असलेल्या गावात तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे.२००९ चा अपवाद वगळता जत तालुक्यात प्रत्येकवर्षी पाणीटंचाई जाणवत आहे. पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी शासनाचे प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. परंतु यातून कायमस्वरुपी पाणीटंचाई कमी होत नाही.



पाणीटंचाई कामात शासन सतर्क आहे. टँकर मागणीचे प्रस्ताव आल्यानंतर त्या गावाचे सर्वेक्षण करून आवश्यकता असल्यास तेथे तात्काळ टँकर मंजूर करून पाणी पुरवठा केला जात आहे.
- प्रमोद गायकवाड
प्रांताधिकारी, जत

Web Title: Water tanker gets water during monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.