महापौरांच्या प्रभागात टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 05:51 PM2019-06-01T17:51:38+5:302019-06-01T17:52:38+5:30

ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली असताना, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे मिरज शहरात पाणीटंचाई आहे. महापौरांच्या प्रभागात समतानगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शहरात दररोज ३५ दशलक्ष लिटर पाण्याची मागणी असताना, २५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे.

Water tanker in mayor's division | महापौरांच्या प्रभागात टँकरने पाणी

महापौरांच्या प्रभागात टँकरने पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देमहापौरांच्या प्रभागात टँकरने पाणी अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे मिरज शहरात पाणीटंचाई

मिरज : ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली असताना, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे मिरज शहरात पाणीटंचाई आहे. महापौरांच्या प्रभागात समतानगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शहरात दररोज ३५ दशलक्ष लिटर पाण्याची मागणी असताना, २५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे.

मिरज शहरासाठी ५० वर्षापूर्वीच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेवर मोठा ताण आहे. लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने मिरज शहर व विस्तारित भागातील तब्बल २ लाख लोकसंख्येसाठी दररोज ३५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र दररोज २५ दशलक्ष लिटर पाणीपुवठा होत असल्याने विस्तारित भागात पाणीटंचाई व शहरात कमी दाबाने पाणीपुवठ्याची समस्या आहे. त्यातच जुन्या जलवाहिन्यांच्या वारंवार गळतीमुळे पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होतो.

शहराच्या विस्तारित भागात महापालिकेतर्फे पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांत टँकरने पाणी सोडण्यात येत आहे. पाच वर्षापूर्वी मिरजेत दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोच्या साथीमुळे अनेकांचे बळी गेल्यानंतर, जुन्या व जीर्ण जलवाहिन्या बदलून सुधारित नळपाणीपुरवठ्यासाठी मिरज शहरासाठी १०८ कोटी रूपये खर्चाच्या अमृत जल योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली. मात्र ही नळपाणी पुरवठा योजना रखडल्याने पाण्याची समस्या कायम आहे.

महापौरांचा प्रभाग असलेल्या समतानगरात एक दिवसआड नळाला पाणी येत असून चार दिवसांपूर्वी पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार व सुधारित नळपाणी योजना रखडल्याने मिरज शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कृष्णाघाट येथून ताशी १५ लाख लिटर क्षमतेने २४ तास पाणी उपसा केल्यानंतरही, पाणी वितरण यंत्रणेतील त्रुटीमुळे शहरात पाणी अपुरे पडत आहे.

शहरात दाट लोकवस्तीत दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली असताना, शहरातील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
 

Web Title: Water tanker in mayor's division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.