‘टेंभू’चे पाणी २५ ला अर्जुनवाडीत भारत पाटणकर : पाणीपट्टीतून वीज बिलाचा खर्च वसुलीस स्थगिती
By admin | Published: May 14, 2014 12:06 AM2014-05-14T00:06:49+5:302014-05-14T00:07:02+5:30
सांगली : पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आटपाडी तालुक्यात भीषण पाणी टंचाई असल्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी केली होती.
सांगली : पुरेसा पाऊस न झाल्यामुळे आटपाडी तालुक्यात भीषण पाणी टंचाई असल्यामुळे टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार अधीक्षक अभियंत्यांनी २५ मे २०१४ पर्यंत आटपाडी तालुक्यातील अर्जुनवाडी तलावात पाणी सोडून सांगोला तालुक्यातील बुधीहाळ तलावात सोडण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली. तसेच ते म्हणाले की, वीज बिलाचा खर्च दुरुस्ती व देखभाल खर्च म्हणून धरला जाईल. वीजबिल पाणीपट्टीच्या माध्यमातून शेतकर्यांकडून वसूल करण्यात येणार नाही, असे लेखी पत्र महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी दिले आहे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, आटपाडीत पाणी टंचाई असल्यामुळे टेंभू योजनेतून पाणी सोडण्याबाबत सांगलीतील पाटबंधारे कार्यालयात बैठक झाली. यावेळी अधीक्षक राजेंद्र मोहिते, कार्यकारी अभियंता शिंदे, कार्यकारी अभियंता महेश सुर्वे, पाणी चळवळीतील आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, शेख, संतोष गोठल, महादेव देशमुख, मनोहर विभुते आदी उपस्थित होते. अर्जुनवाडी तलावात पाणी सोडण्याच्यादृष्टीने टेंभू योजनेच्या अधिकार्यांना शेतकरी मदत करणार आहेत. श्रमदानातून शेतकरी पोटकालव्याची किरकोळ खुदाई असेल ती करून पाण्याचा अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. विहिरी, तलाव, बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. पाणी सोडण्यापूर्वी मोजमापन पध्दतीने शेतकरी अधिकार्यांकडे पाणीपट्टीही भरणार आहेत. अर्जुनवाडी तलावात पाणी आल्यानंतर आटपाडी तालुक्यातील ७५ टक्के भागाला पाणी मिळण्यास मदत होणार आहे. निधी कमी पडत असेल, तर शासनाविरोधात लढा उभारून तो मिळविण्यात येईल, असेही पाटणकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, पाणीपट्टी आकारणी झाल्यानंतर वीज बिलाचे पैसेही शेतकर्यांकडून वसूल केले जात होते. याविरोधात आम्ही महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणचे अध्यक्ष पुदीराजा यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानुसार पुदीराजा यांनी वीज बिल हे दुरुस्ती व देखभाल खर्चाचा भाग म्हणून धरण्याची सूचना दिली आहे. तसे लेखी पत्र मागील आठवड्यात मिळाले आहे. (प्रतिनिधी)