‘टेंभू’चे पाणी आता बंद पाईपमधून

By admin | Published: June 24, 2016 11:46 PM2016-06-24T23:46:22+5:302016-06-25T00:51:10+5:30

भारत पाटणकर : राज्य शासनाकडून मंजुरी; आटपाडी-तासगाव तालुक्यातील गावांना लाभ

The water of 'Tembhu' is now closed from the pipe | ‘टेंभू’चे पाणी आता बंद पाईपमधून

‘टेंभू’चे पाणी आता बंद पाईपमधून

Next

सांगली : पाण्याची वाढती टंचाई आणि त्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने टेंभू योजनेचे पाणी वाटप बंद पाईपद्वारे करण्यास मंजुरी दिली आहे. बंद पाईपद्वारे वितरण व्यवस्था असणारीही देशातील पहिली योजना असेल, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. आटपाडी आणि तासगावसाठी समन्यायी पाणी वाटपालाही मंजुरी मिळाली आहे. यामुळे शंभर टक्के लाभक्षेत्राला पाणी मिळण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, पाण्याचे योग्य नियोजन होण्यासाठी बंद पाईपद्वारे टेंभू योजनेचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी आमची मागणी होती. या प्रश्नावर अनेक आंदोलनेही केली. त्यामुळे दि. २१ जूनरोजी मंत्रालयात जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव चहल, लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव उपासे, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक आणि डॉ. पाटणकर, पाणी संघर्ष चळवळीचे आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, विजयसिंह पाटील, मोहनराव यादव, संतोष गोटल आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीमध्ये टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचे वितरण शेतकऱ्यांना बंद पाईपद्वारे करण्यावर चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव पूर्वीच सादर केला होता. सविस्तर चर्चेनंतर प्रधान सचिव चहल यांनी टेंभू योजनेतून लाभक्षेत्रातील कऱ्हाड, कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, सांगोला, कवठेमहांकाळ तालुक्यातील ८० हजार ४७२ हेक्टरला बंद पाईपद्वारे पाणी देण्यास मंजुरी देत असल्याचे घोषित केले. यासाठीचा निधी तातडीने देण्याचेही त्यांनी मान्य केले आहे. या निर्णयामुळे लाभक्षेत्र दीडपटीने वाढणार असून, योजनेचा खर्च मात्र कमी होणार आहे. यामुळे योजनेचे कामही गतीने पूर्ण होईल.
ते म्हणाले की, बंद पाईपद्वारे पाणी वितरणाच्या ऐतिहासिक निर्णयाबरोबरच तासगाव आणि आटपाडी तालुक्यामध्ये समन्यायी पाणी वाटपाचा पथदर्शक प्रकल्प मंजूर झाला आहे. यामुळे तालुक्यातील शंभर टक्के लाभक्षेत्राला पाणी मिळण्यास मदत होणार आहे. प्रत्येक कुटुंबाला वार्षिक पाच हजार घनमीटर पाणी मिळणार आहे. यातून पाटाद्वारे तीन हेक्टर आणि ठिबक सिंचनद्वारे नऊ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The water of 'Tembhu' is now closed from the pipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.