टेंभू सुधारित योजनेमुळे ४१ हजार ००३ हेक्टर क्षेत्राला पाणी; सांगलीसह सातारा, सोलापूर जिल्ह्यातील गावांना फायदा

By अशोक डोंबाळे | Published: December 16, 2023 04:39 PM2023-12-16T16:39:39+5:302023-12-16T16:40:02+5:30

अशोक डोंबाळे सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सात हजार ३७०.०३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास शासनाने हिवाळी अधिवेशनावेळी ...

Water to 41 thousand 003 hectare area due to Tembu Revised Scheme, Villages in Satara, Solapur districts along with Sangli will benefit | टेंभू सुधारित योजनेमुळे ४१ हजार ००३ हेक्टर क्षेत्राला पाणी; सांगलीसह सातारा, सोलापूर जिल्ह्यातील गावांना फायदा

टेंभू सुधारित योजनेमुळे ४१ हजार ००३ हेक्टर क्षेत्राला पाणी; सांगलीसह सातारा, सोलापूर जिल्ह्यातील गावांना फायदा

अशोक डोंबाळे

सांगली : टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सात हजार ३७०.०३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास शासनाने हिवाळी अधिवेशनावेळी गुरुवारी मान्यता दिली. त्यामुळे सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील १०९ गावांमधील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली येणार आहे. तसेच, टेंभूला पूर्वी २२ टीएमसी पाणी मिळत होते. त्यामध्ये नव्या मान्यतेने ८ टीएमसी पाण्याची भर पडणार आहे.

टेंभू योजनेमध्ये सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांतील २४० गावांमधील ८० हजार ४७२ हेक्टर शेतीला पाणी देण्याचे नियोजन होते. त्यानुसार मुख्य कालव्यासह वितरण व्यवस्थेची कामे झाली आहेत. या कामावर आजअखेर तीन हजार ४०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तसेच चार हजार ८८ कोटी ९४ लाख रुपयांच्या द्वितीय सुधारित खर्चास शासनाने यापूर्वीच मंजुरी दिली होती. या योजनेच्या लाभापासून सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील जत तालुका वंचित राहिले होते. तसेच योजनेत सहभागी तालुक्यांतीलही काही गावे वंचित राहिली होती.

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर व सुमनताई पाटील यांनी शासनाकडे रेटा लावला. त्यामुळे तिन्ही जिल्ह्यातील १०९ वंचित गावांचा टेंभू योजनेत समावेश केला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील १८, खटाव तालुक्यातील २८, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील १५, तासगाव १३, आटपाडी १३, कवठेमहांकाळ ८, जत ४ आणि सांगोला तालुक्यातील १० गावांचा नव्याने समावेश झाला आहे. त्यामुळे या आठ तालुक्यांतील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र नव्याने सिंचनाखाली येणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने अतिरिक्त ८ टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे.

नव्याने सिंचनाखाली येणारे क्षेत्र
तालुका  - गावे  - सिंचन क्षेत्र (हेक्टर) - पाणी वापर

माण -  १८ - ५६-  ८६ - १ टीएमसी
खटाव - २८ - ७४- ४० - १.५ टीएमसी
खानापूर - १५ - ६४- ७१ - १.५ टीएमसी
तासगाव - १३ - ६० - २६ - १ टीएमसी
आटपाडी - १३ - ५२ - ९४ - १ टीएमसी
कवठेमहांकाळ - ८ - ४२- ५५ - ०.५ टीएमसी
जत   - ४ - २६ - ३६ - ०.५ टीएमसी
सांगोला - १० - ३१ - ९५ - १ टीएमसी
एकूण  -  १०९ - ४१००३  - ८ टीएमसी

जिल्ह्यातील या गावांचा नव्याने समावेश

खानापूर तालुका : भिकवडी (बु.), करंजे, रेणावी, रेवणगांव, भडकेवाडी, घाेटी (बु.), घोटी (खु.), धोंडगेवाडी, ऐनवाडी, जखीनवाडी, जाधववाडी, घाडगेवाडी, बानुरगड, कुसबावडे, ताडाचीवाडी,
तासगाव तालुका : वायफळे, बिरणवाडी, यमगरवाडी, दहिवडी, कचरेवाडी, किंदरवाडी, नरसेवाडी, धोंडेवाडी, विजयनगर, सावळज, डोंगरसोनी, वडगाव, लोकरेवाडी
कवठेमहांकाळ : गर्जेवाडी, कुंडलापूर, रायवाडी, केरेवाडी, शेळकेवाडी, जाखापूर, जायगव्हाण, लोणारवाडी, आटपाडी : आंबेवाडी, बोंबेवाडी, राजेवाडी, काळेवाडी, खाजोडवाडी, लिंगीवरे, उंबरगाव, पांढरेवाडी, पिंपरी (खु.), पुजारवाडी (दिघंची), विभूतवाडी, गुळेवाडी, पडळकरवाडी 
जत : बेवनूर, नवाळवाडी, वाळेखिंडी, सिंगणहळ्ळी.

टेंभू योजनेच्या सात हजार ३७०.३ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे टेंभू योजनेत सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील १०९ गावांतील ४१ हजार ३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहेत. निधीला मंजुरी मिळाल्यामुळे तत्काळ कामे सुरू करून वंचित गावांमधील शेतीला पाणी देण्यात येणार आहे. -चंद्रशेखर पाटोळे, अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ.

Web Title: Water to 41 thousand 003 hectare area due to Tembu Revised Scheme, Villages in Satara, Solapur districts along with Sangli will benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.