Sangli: कृष्णा कालव्यातून दोन दिवसात पलूसला पाणी, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील 

By अशोक डोंबाळे | Published: March 6, 2024 12:06 PM2024-03-06T12:06:10+5:302024-03-06T12:06:31+5:30

रब्बी हंगामासाठी एक टीएमसी पाणी मिळणार

Water to Palus from Krishna canal in two days, Approval from Satara District Collector | Sangli: कृष्णा कालव्यातून दोन दिवसात पलूसला पाणी, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील 

Sangli: कृष्णा कालव्यातून दोन दिवसात पलूसला पाणी, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून हिरवा कंदील 

सांगली : कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार डुडी यांनी तारळी धरणातून कृष्णा कालव्यात एक टीएमसी पाणी सोडण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे. या निर्णयामुळे पलूस, वाळवा, तासगाव, मिरज, कऱ्हाड तालुक्यातील ५४ गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे.

कृष्णा कालव्याचे पाणी पलूस तालुक्यातील तुपारी ते वसगडेपर्यंत जाते. तालुक्यातील बहुतांश शेती ही आरफळ व कृष्णा कालव्यावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून आरफळ योजना व कृष्णा कालव्यात पाणी सोडले नसल्याने या भागातील शेती धोक्यात आली आहे. पाण्याअभावी सध्या ऊस, द्राक्ष, केळी, भाजीपाला, फुले व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

पाटबंधारे विभागातील राजकीय हस्तक्षेप थांबून कोर्टाच्या आदेशप्रमाणे कृष्णा कालव्यावर आरक्षित असलेले २.७० टीएमसी पाणी नियमित फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आवर्तन सुरळीत सुरू व्हावे, अन्यथा अजूनही भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. सर्व शेतकऱ्यांचा दृष्टीने कृष्णा कालव्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती.

मात्र, सातारा जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे कृष्णा कालव्यात पाणी सोडले जात नव्हते. म्हणून शेतकरी आक्रमक झाले होते. याची गंभीर दखल घेऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगली जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे तारळी धरणातून कृष्णा कालव्यात रब्बी हंगामासाठी एक टीएमसी पाणी सोडण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे एक टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करणारे पत्र दिले आहे.

सातारा जिल्हाधिकारी डुडी यांनी सातारा जलसंपदा विभागाला तारळी धरणातून पाणी सोडण्याबाबत सूचना केली आहे. या निर्णयामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस, वाळवा, तासगाव व मिरज तालुक्यातील १३ हजार ३६६ हेक्टर क्षेत्रातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

लोकप्रतिनिधी न्यायालयाचा आदेशही पाळणार नाहीत का?

न्यायालयाने कृष्णा कालव्यात वर्षभरात २.७० टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. तरीही पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि राजकीय नेत्यांकडून सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतील ५४ गावांच्या हक्काचे पाणी अडविले जात आहे. खरीप आणि रब्बी हंगामामध्ये आतापर्यंत २.७० टीएमसीपैकी एकही टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला मिळाले नाही. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी न्यायालयाचे आदेशही पाळणार नाहीत का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: Water to Palus from Krishna canal in two days, Approval from Satara District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.