सिंचन योजनांना थकीत पाणीपट्टीचे ग्रहण
By admin | Published: July 21, 2016 11:38 PM2016-07-21T23:38:20+5:302016-07-22T00:03:21+5:30
शेतकऱ्यांमध्ये जागृती आवश्यक : टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजनांची ६६ कोटी पाणीपट्टी, तर ४४ कोटीचे विद्युत बिल थकीत
अशोक डोंबाळे -- सांगली -जिल्ह्यात टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांची ६६ कोटींची पाणीपट्टी आणि ४४ कोटीचे वीज बिल थकित आहे. शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे थकित वीजबिल वसुलीचे मोठे आव्हान आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी थकीत बिल भरल्याशिवाय सिंचन योजनांचे पंप सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. यामुळे दुष्काळी भागासाठी पुराचे पाणी उचलायचे म्हटले तरीही शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरल्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसत आहे.
टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाल्यामुळे दुष्काळी भागाला दिलासा मिळाला आहे. टेंभू योजनेचे पाणी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यापर्यंत पोहोचले आहे. कडेगाव, खानापूर, आटपाडी, सांगोला, कवठेमहांकाळ तालुक्यातील २२ हजार ८१३ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळाले आहे. टेंभू योजनेने दुष्काळामध्येही येथील पिके जगविली आहेत. या लाभक्षेत्राला पाणी देण्यासाठी २२ कोटी ५१ लाख रुपयांचा वीज खर्च आला आहे. यापैकी टंचाई योजनेतून ३३.५० टक्क्याची वीज सवलत मिळाली असून, ते ४ कोटी ७ लाख रुपये माफ झाले आहेत. उर्वरित ६ कोटी ३ लाख रुपये शेतकऱ्यांनी भरले आहेत. सध्या १२ कोटी ४१ लाख रुपयांचे वीज बिल थकीत असून, ते शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीतूनच भरावे लागणार आहे. टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडे १२ कोटी ७७ लाख ८६ हजारांची पाणीपट्टी थकीत आहे. थकीत पाणीपट्टीमध्ये काही त्रुटी असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. पाणी मिळत नसतानाही तेथे पाणीपट्टी आकारली असून, ती कमी करण्याची गरज आहे. हा गोंधळ वगळता ज्या शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे, त्यांनी पाणीपट्टी भरल्यास सध्याचा थकीत वीज बिल भरण्याचा प्रश्न सुटणार आहे.
टेंभू योजनेसारखीच ताकारी योजनेची परिस्थिती आहे. ताकारी योजनेचे १५ कोटी ७१ लाख वीज बिल थकीत असून, टंचाई सवलतीतून ४ कोटी ३९ लाख रुपये माफ झाले आहेत. शेतकऱ्यांकडून वसूल झालेल्या पाणीपट्टीतून ५ कोटी ३७ लाख रुपये भरले आहेत. सध्या ५ कोटी ९५ लाख रुपये भरायचे आहेत. शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसुली झाल्यास महावितरणची थकबाकी भरण्याचा प्रश्न लगेच सुटण्यासारखा आहे.
ताकारी योजना कार्यान्वित झाल्यापासून आतापर्यंत तीस कोटींची पाणीपट्टी थकीत आहे. जुन्या थकबाकीचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे. उर्वरित पाणीपट्टी शेतकऱ्यांवर निश्चित करूनच ती वसूल करावी लागणार आहे.
म्हैसाळ योजनेचे सर्वाधिक ३४ कोटी ७३ लाखांचे वीज बिल थकीत आहे. यापैकी टंचाई योजनेतून सहा कोटी चार लाखांचे वीज बिल महावितरणने माफ केले आहे. शेतकऱ्यांकडून सहा कोटी ३३ लाखांची पाणीपट्टी वसूल करून वीज बिल आतापर्यंत भरले आहे. सध्या २२ कोटी ३६ लाखांचे वीज बिल थकीत आहे. या थकबाकीमध्ये चालूच्या एक कोटीच्या बिलाची भर पडली आहे. महावितरण कंपनीने वीज बिलाची थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या पुराचे पाणी दुष्काळग्रस्तांना द्यायचेच म्हटले, तर तिन्ही योजनांचे चालूचे चार कोटी रूपये तातडीने भरावे लागणार आहेत. त्यानंतरच सिंचन योजना सुरू करून दुष्काळग्रस्तांना पाणी देणे शक्य होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांमध्येही पाणीपट्टी भरण्याविषयी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी जागृती करण्याची गरज आहे. थकीत पाणीपट्टी शेतकऱ्यांनी भरली, तर रिकामे तलाव सिंचन योजनेच्या पाण्यातून भरणे शक्य होणार आहे.
मध्यम प्रकल्प : केवळ ३५ टक्के पाणीसाठा
पावसाळ्यात मुबलक पाण्याचा साठा असणारे महत्त्वाचे पाच मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये पावसाळ्यातच केवळ ३५ टक्के पाणीसाठा असल्याचे पाटबंधारे विभागाच्या दि. १४ जुलै २०१६ रोजीच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. यामध्ये सिध्देवाडी (ता. तासगाव), जत तालुक्यातील दोड्डनाला, संख या तीन मध्यम प्रकल्पात शून्य पाणीसाठा आहे. बसाप्पावाडी तलावामध्ये १२ टक्के, तर शिराळा तालुक्यातील मोरणा प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा आहे.