Sangli News: कृष्णेतील पाणी उपसा बंदी येत्या सोमवारपर्यंत कायम, पाटबंधारे विभागाचा निर्णय
By अशोक डोंबाळे | Published: June 17, 2023 07:11 PM2023-06-17T19:11:03+5:302023-06-17T19:11:22+5:30
सांगली, मिरजेतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर निर्णय
सांगली : कोयना धरणात ११.५३ टीएमसी तर वारणा धरणात ११.१८ टीएमसी पाणीसाठा आहे. पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरवणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच कृष्णा नदीमधून शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या सर्व योजनांसाठी दि. १८ व १९ जूनपर्यंत उपसा बंदी आदेश सांगली पाटबंधारे विभागामार्फत लागू केला आहे. दि. २० ते २२ जून कालावधीत उपसा कालावधी असणार आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी जाहीर केले.
सांगली पाटबंधारे मंडळच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी कोयना धरणातील पाणीसाठ्याचा विचार करून कृष्णा नदीतून दि. १४ ते १७ जून या चार दिवसांसाठी उपसाबंदी आदेश लागू केला होता. परंतु कृष्णा नदीतील साटपेवाडी बंधाऱ्यावर ताकारी सिंचन योजनेसाठी पाणीसाठा केला होता. ताकारी योजना बंद केल्यामुळे साटपेवाडी बंधाऱ्यातून पाणी सोडून तीन दिवस झाले तरीही कृष्णा नदीचे पाणी सांगलीपर्यंत येऊ शकले नाही. शनिवारी पद्माळे (ता. मिरज) येथे कृष्णा नदीतील पाणी आले असून रविवारी सांगलीत येणार आहे.
कृष्णा नदीतील पाणी पुढे गतीने सरत नसल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि. १८ आणि १९ जूनपर्यंत उपसा बंदी आदेश वाढविला आहे. दि. २० ते २२ या तीन दिवसांत शेतीला पाणी उपसा करण्यासाठी परवानगी दिली आहे.
पाणी, वीजपुरवठा रद्द करणार
उपसा बंदी कालावधीमध्ये पिण्याचे पाणीपुरवठा व्यतिरिक्त इतर कारणांसाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनधिकृत समजून संबंधितांचा पाणी परवाना व विद्युतपुरवठा रद्द करण्यात येणार आहे. उपसा संच सामुग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशाराही कार्यकारी अभियंता देवकर यांनी दिला आहे. धरणातील मर्यादित पाणीसाठ्याचा विचार करून सांडपाणी, औद्योगिक वापरातील पाणी थेट नदीत सोडल्यास कठोर कारवाईचाही त्यांनी इशारा दिला आहे.
टेंभू योजना बंद, ५०० क्युसेकने पाण्याला गती मिळेल
टेंभू उपसा सिंचन योजनेचे दहा ते बारा पंप चालू होते. या पंपाद्वारे जळवास ५०० क्युसेक पाणी उपसा होत होता. पाणीटंचाई लक्षात घेऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी टेंभू योजना शनिवारी बंद केली आहे. यामुळे कृष्णा नदीत ५०० क्युसेकच्या पाण्यास गती मिळणार आहे. यामुळे कृष्णा नदीतील पाणी प्रवाहित राहण्यास मदत होईल, असेही कार्यकारी अभियंता ज्योती देवकर म्हणाल्या.