पाणीपट्टी अन थकबाकी वसुलीत विश्वासार्हता हवी
By Admin | Published: January 18, 2016 11:12 PM2016-01-18T23:12:57+5:302016-01-18T23:34:37+5:30
आकारणीबाबत शेतकरी संभ्रमात : टंचाईतून वीज बिल भरावे
दादा खोत -- सलगरे -टंचाई निधीतून अगर शासनाने वीज बिल भरून ही योजना चालणार नाही. शेतकऱ्यांनीच या योजनेकडे सकारात्मकदृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. वर्षभर पाणी सोडण्याची शाश्वती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. पाटबंधारे विभागाकडून यशस्वी योजना चालविण्यासाठी या पाण्याचे निश्चित लाभार्थी कोण, याचा सर्व्हे होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या पाणी मागणी अर्जावर पाणीपट्टीचे अगर पाणी सोडण्याचे नियोजन न करता, संभावित पाणी उपयोजित लाभक्षेत्राचा सर्व्हे होऊन त्यावर पाणीपट्टी आकारणे आवश्यक आहे. शिवाय हेक्टरी संभावित पाणीपट्टी किती आहे, याबाबतही शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.
संभावित पाणीपट्टी आणि पाणी आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर करणे, ते प्रत्येकलाभक्षेत्रापर्यंत पोहोचवणे याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून केल्यास शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वती मिळेल आणि त्यानुसार पिकांचे नियोजनही त्यांना करता येईल. सिंचनासाठी शेतकऱ्यांना इतर पर्यायी मार्गासाठी पैसे खर्च करण्याची गरज राहणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार नाही. थकबाकी भरण्याची कुवत त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे.
ग्लोबल होण्याची भाषा करणाऱ्या शासनाला अजूनही दुष्काळातील शेतीला योजना तयार असूनही पाण्याचे योग्य नियोजन करता आले नाही. पाटबंधारे विभागाच्या काटेकोर नियोजनासाठी शासनाने आणि लोकप्रतिनिधीनी लक्ष वेधले पाहिजे. ज्या मूळ हेतूसाठी योजना तयार झाली, त्याचा विसर राज्यकर्त्यांना पडता कामा नये. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना दुष्काळाचे (निधीचे) लालूच दाखवून वर्षातून एखादा महिना आवर्तन देऊन, लोकांची दिशाभूल करणे थांबविणे गरजेचे आहे. योजना यशस्वी होण्यासाठी पाटबंधारे विभागाने पुढील बाबींचा विचार गांभीर्याने केला पाहिजे. (क्रमश:)
वर्षभर पाण्याची पाटबंधारे विभागाकडून शाश्वती दिली गेली पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये योजनेविषयी विश्वासार्हता अजूनही आली नाही. सात-बारावर बोजा चढविण्यासारख्या धमक्या प्रशासनाने थांबवून, पाणी नियोजन आणि पाणीपट्टी थकबाकी वसुलीबाबत शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्हता वाढविणे गरजेचे आहे.
- आबासाहेब साळुंखे,
माजी सरपंच, कोगनोळी.
लाभक्षेत्र निश्चित करावे
योजनेअंतर्गत येणाऱ्या निश्चित लाभक्षेत्राचा शोध घेणे.
लाभक्षेत्र निश्चित केल्यानंतर संभावित पाणीपट्टी जाहीर करणे
पाण्याच्या आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर करणे
पाणीपट्टीचे निश्चित देयक तयार करून ते लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करणे.