म्हैसाळच्या पाटात श्रेयवादाची लाट : जनता संभ्रमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:28 AM2018-03-25T00:28:40+5:302018-03-25T00:28:40+5:30
अर्जुन कर्पे।
कवठेमहांकाळ : दुष्काळी तालुक्यांना वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाटात श्रेयवादाची लाट उसळली असून, ऐन उन्हाळ्यात या पाण्याच्या राजकारणाने पेट घेतला आहे. त्यामुळे नेमके पाणी कुणी सोडले, या संभ्रमात शेतकरी व जनता पडली आहे. तसेच कुणी का सोडेना एकदाचे पाणी सुटले म्हणून सुस्काराही सोडला आहे.
म्हैसाळ योजनेच्या जन्मापासूनच या योजनेला राजकारणाचे ग्रहण लागले आहे. ते आजपर्यंत काय सुटलेले नाही. मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, जत हे दुष्काळी तालुके या सिंचन योजनेच्या लाभक्षेत्राखाली येतात. यावर्षी म्हैसाळचे पाणी सोडण्याचे व सोडल्याचे श्रेय लाटण्यासाठी नेत्यांची स्पर्धा लागलेली संपूर्ण जिल्ह्याने पाहिली. खासदार संजयकाका पाटील यांनी या पाण्यासाठी आपली खासदारकी पणाला लावली. पाणी सोडले नाही तर, आपण राजीनामा देऊ, असे जाहीर केले. यासाठी त्यांनी दोन दिवस मुंबापुरीत फडणवीससाहेबांच्या दरबारात तळ ठोकला.
फडणवीसांच्या दरबारातील जलदेव गिरीश महाजन यांचीही मनधरणी करून काम फत्ते केल्याचे खा. संजयकाकांनी तातडीने जिल्ह्यात निरोप धाडले आणि सोशल मीडियात खा. संजयकाका म्हैसाळच्या पाटातून मिरजपूर्व ते कवठेमहांकाळ व्हाया जत असे वाहण्यास सुरुवात झाल्याची चर्चा सुरू झाली.
गेले दोन महिने या पाण्यासाठी कोण काय करतं याकडे जनताही लक्ष ठेवून आहे. तर माजी मंत्री अजितराव घोरपडे, आ. सुमनताई पाटील, आ. सुरेश खाडे हे नेतेही खा. संजयकाका यांच्या हालचालींवर टेहळणी करीत होते. यामधील आ. सुरेश खाडे यांनी भाजप पक्षीय असल्याने खा. पाटील यांच्यासमवेतच या पाटात अंघोळ करण्याचा निर्णय घेतला.
अजितराव घोरपडे आणि आ. सुमनताई पाटील यांनी याचे श्रेय खा. संजयकाका पाटील यांच्याकडे जाऊ नये म्हणून थेट मुंबापुरी गाठून जलदेव गिरीश महाजन यांची भेट घेतली व पाणी सोडण्यासाठी लेखी मागणी केली. त्याचे फोटोही वाºयासारखे खा. पाटील सांगलीत दाखल व्हायच्या आधी व्हायरल करण्यात आले आणि पाठपुराव्याला यश आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जनता मोठ्या बुचकळ्यात पडली.
म्हैसाळचे पाणी प्रभावी हत्यार
आता कुणाचे नाव घ्यायचे म्हणून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना वर्ष, दीड वर्षाचा कालावधी उरला आहे. त्याच्या आधी जनतेसमोर जाण्यासाठी म्हैसाळचे पाणी हे प्रभावी हत्यार म्हणून वापरता यावे यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी या पाण्याचे श्रेय घेण्यासाठी कंबर कसली असल्याचे जनता उघड बोलू लागली आहे.