लहरी वातावरण :सांगली शहरावर धुक्याची चादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 06:27 PM2020-09-09T18:27:12+5:302020-09-09T18:29:40+5:30
गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील लहरीपणा सांगली जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवास येत आहे. पाऊस, उकाडा आणि आता धुकेही पडत आहेत. बुधवारी सकाळी शहर व परिसरात धुक्याची चादर पसरली होती.
सांगली : गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील लहरीपणा सांगली जिल्ह्यातील नागरिकांना अनुभवास येत आहे. पाऊस, उकाडा आणि आता धुकेही पडत आहेत. बुधवारी सकाळी शहर व परिसरात धुक्याची चादर पसरली होती.
जिल्ह्याच्या कमाल व किमान तापमानातही गेल्या सहा दिवसांमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी किमान तापमान २१ तर कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. जिल्ह्यातील हवेतील सापेक्ष आर्द्रताही वाढली आहे. सापेक्ष आर्द्रता सध्या ९५ टक्के इतकी झाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पावसाचीही हजेरी लागत आहे. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे अधून-मधून सूर्यदर्शन होत होते. ऊन-सावलीचा खेळ दिवसभर रंगला होता. सकाळी सहा वाजता सांगली शहर व परिसरात धुक्याची चादर पसरली. धुक्यांची अधिक दाटी नव्हती. तरीही वातावरणाचे वेगवेगळे अनुभव लोकांना येत आहेत.
भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार १0 ते १३ सप्टेंबर या काळात जिल्ह्याच्या बहुतांश भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. या चार दिवसात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. त्यानंतर १४ सप्टेंबरला हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल. या काळात किमान व कमाल तापमानात अंशाने वाढ होणार आहे.