यंदा कृष्णाकाठावरुनच मायाक्का देवीच्या नावानं चांगभलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 05:35 PM2021-02-27T17:35:44+5:302021-02-27T17:50:21+5:30
Religious Places Sangli Coronavirus- चिंचली (ता. रायबाग ) येथील मायाक्का देवीची यात्रा रद्द झाल्याने महाराष्ट्रातील शेकडो यात्रेकरु बैलगाडीतून परतीच्या मार्गावर निघाले आहेत. यात्रेसाठी चिंचली परिसरात ठिय्या मारलेल्या भाविकांना कर्नाटक पोलीस हाकलून लावत आहेत. नव्याने भाविक येऊ नयेत यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर नाकेबंदी करण्यात आली आहे.
सांगली : चिंचली (ता. रायबाग ) येथील मायाक्का देवीची यात्रा रद्द झाल्याने महाराष्ट्रातील शेकडो यात्रेकरु बैलगाडीतून परतीच्या मार्गावर निघाले आहेत. यात्रेसाठी चिंचली परिसरात ठिय्या मारलेल्या भाविकांना कर्नाटक पोलीस हाकलून लावत आहेत. नव्याने भाविक येऊ नयेत यासाठी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर नाकेबंदी करण्यात आली आहे.
चिंचलीची मायाक्का देवीची प्रसिद्ध यात्रा २६ फेब्रुवारीपासून नियोजित होती. करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने यात्रा भरविण्याचा निर्णय देवस्थान समिती व बेळगाव जिल्हा प्रशासनाने घेतला होता. तशा जाहिरातीही प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानुसार यात्रा ७ मार्चपर्यंत चालणार होती. यात्रेचा मुख्य दिवस मंगळवारी (ता. २ ) होता. यादिवशी पालखीसोहळा नियोजित होता.
गेल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात ठिकठिकाणी कोरोना रुग्ण नव्याने सापडू लागल्याने यात्रेचा फेरविचार करावा लागला. चिंचलीला महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात, हे लक्षात घेऊन यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. याजत्रेतील नित्योपचार पुजार्यांच्या, विश्वस्तांच्या व मानकर्याच्या उपस्थितीतच केले जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर यात्रेला निघालेल्या भाविकांना रस्त्यातूनच परतवून लावले जात आहे. चिंचली गावात भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. कागवाड-म्हैसाळदरम्यानच्या चेकपोस्टवर यात्रेकरुंच्या बैलगाड्या अडवल्या जात आहेत. कुडची येथे कृष्णा नदीकाठी मोठ्या संख्येने भाविक ठिय्या मारुन आहेत. पोलीसांनी त्यांनाही हाकलून लावले.
काही श्रद्धाळूंनी नदीकाठीच नैवेद्य बनवून तेथून दुसर्या तिरावर देवीला अर्पण केला व दर्शनाचे समाधान मानून घेतले. उगारमध्येही अथणीकडून येणार्या भाविकांची परत पाठवणी केली जात आहे. कागवाड सीमेवर प्रवाशांची कडक तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे.
चिंचलीमध्ये रायबाग रस्त्यावरल ओढ्याच्या परिसरातही भाविकांना थांबण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यात्रा रद्द झाल्याचे बेळगाव जिल्हाधिकार्यांनी आठवडाभरापूर्वीच जाहीर केले आहे, शिवाय सांगली पोलीसांनीही यात्रेला न जाण्याचे आवाहन केले आहे