जिल्ह्यात राष्ट्रवादी संपण्याच्या मार्गावर
By admin | Published: February 19, 2017 11:15 PM2017-02-19T23:15:14+5:302017-02-19T23:15:14+5:30
पतंगराव कदम : अनेक तालुक्यांमधील अस्तित्व संपले
सांगली : आटपाडी, पलूस, कडेगाव, खानापूर अशा अनेक तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी अस्तित्वशून्य बनली आहे. त्यांचा पक्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे, अशी टीका आ. पतंगराव कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली.
ते म्हणाले की, तडजोडीच्या राजकारणाने राष्ट्रवादीचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही अनेक ठिकाणी सोयीच्या आघाड्या त्यांनी केल्या. भाजप व शिवसेनेसोबत आघाडी न करण्याची भूमिका कॉँग्रेससह राष्ट्रवादीनेही स्वीकारली होती. तरीही बऱ्याच तालुक्यात त्यांनी भाजपबरोबर आघाडी केल्याचे दिसत आहे.
पक्षाच्या चिन्हावर सर्वाधिक जागा सध्या कॉँग्रेसमार्फत लढविल्या जात आहेत. अन्य पक्षांची स्थिती याउलट आहे. या आघाड्यांचे नेमके काय होणार, याचे उत्तर निकालादिवशी मिळणारच आहे. त्याशिवाय नोटाबंदी आणि भाजप सरकारविरोधात लोकांमध्ये काय भावना आहे, त्याचीही चाचणी या निवडणुकीतून होणार आहे.
राष्ट्रवादीने घेतलेले सर्व निर्णय स्थानिक पातळीवरच झाले आहेत. पलूस, कडेगाव येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एकही सदस्य निवडून आला नाही. जयंत पाटील यांच्याशिवाय आता निर्णय घेणारा नेता राष्ट्रवादीत दुसरा कोणीही नाही. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा स्थानिक पातळीवरील निर्णयाशी काहीही संबंध नाही. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला यश मिळेल.
सत्तेपर्यंत आम्ही निश्चित जाऊ. जिल्ह्यात सर्वत्र आम्ही प्रचार केला आहे. त्याठिकाणी लोकांचा प्रतिसाद पाहूनच या गोष्टीचा अंदाज आम्हाला आला आहे. भाजपच्या पदरात काय पडणार आहे, हे निकालादिवशी सर्वांना कळेल. लोकांमध्ये भाजपच्या निर्णयांबद्दल सुप्त संताप आहे. त्याचे पडसाद आता उमटत आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गुंडांची यादी प्रसिद्धच झाली आहे...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही नकार देत असले तरी, त्यांच्या पक्षात किती गुंड आहेत, याची यादीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आम्ही त्याविषयी काही सांगण्याची गरज नाही. पाच राज्यांच्या निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतून भाजपला त्यांच्याबद्दलची लोकभावना कळेल. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे कदम यांनी स्पष्ट केले.
ंजगताप अपघाताने आमदार झाले!
विलासराव जगताप हे अपघाताने आमदार झाले आहेत. सेंटीमीटरची पट्टी घेऊन ते हिमालय मोजण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांचे जातीवादी राजकारण आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लोकच त्यांना योग्यवेळी उत्तर देतील, असे कदम म्हणाले.
घटस्फोट झालाच आहे
मुंबई महापालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळे याठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत टोकाचा संघर्ष सुरू आहे. त्यांचा घटस्फोट झालेलाच आहे. केवळ समझोत्यासाठी नवरा-बायकोस जशी सहा महिन्यांची मुदत मिळते, तशीच मुदत या दोन्ही पक्षांना मिळाली आहे, असे कदम म्हणाले.
राष्ट्रवादीने फसविले
ज्याच्या जागा जास्त, त्याचा अध्यक्ष, असे धोरण राज्यातील सर्व संस्थांमध्ये ठरले होते. मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत हे सूत्र स्वीकारण्यास राष्ट्रवादीने नकार दिला आणि कॉंग्रेसला फसविले. आगामी काळात आघाडीची वेळ आली तरीही जागांच्या संख्येवर पदांचे वाटप करण्याला आमचे प्राधान्य राहील, असे कदम म्हणाले.