सोनी परिसरातील गावे संघर्षाच्या वाटेवर
By admin | Published: July 14, 2014 12:23 AM2014-07-14T00:23:45+5:302014-07-14T00:34:00+5:30
नेत्यांपेक्षा सर्वसामान्य जनताच आंदोलनामध्ये आघाडीवर
सोनी : म्हैसाळ कालव्याच्या पाण्यासाठी सोनीसह परिसरातील वंचित गावे पुन्हा एकदा संघर्षाच्या वाटेवर आहेत. शेतीला पाणी दिल्याशिवाय मतदान करणार नाही, असा इशारा आंदोलनातून देण्यात आला आहे. नेत्यांपेक्षा सर्वसामान्य जनताच आंदोलनामध्ये आघाडीवर असल्याने पाण्याचा हा संघर्ष चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत.
सोनीसह आजूबाजूच्या परिसरातील भोसे, करोली (एम), पाटगाव, सिध्देवाडी, रसूलवाडी, साबरवाडीसह बारा गावे पाण्यासाठी गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून मागणी करत आहेत; पण या भागाकडे नेहमी दुर्लक्षच होत गेल्याची खंत ग्रामस्थांच्या मनात आहे. कालव्याचे पाणी शेतीला मिळाल्यास येथील शेती सुजलाम सुफलाम होईल, या आशेने प्रत्येक निवडणुकीमध्ये येथील जनतेने पाणी देण्याचे आश्वासन देणाऱ्या नेत्याच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आहे. पण जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. जनतेचा संघर्ष कायम राहिला आहे.
ठिबक सिंचनवर शेकडो एकर द्राक्षशेती पिकवणाऱ्या या भागातील शेतकऱ्याने पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात एका एकरासाठी हजारो रुपये खर्च केले आहेत. एका हंगामात लाखो रुपयांचे पाणी विकत घेऊन द्राक्षशेती पिकवली आहे. शासनाची वाट न पाहता काही मोजक्याच शेतकऱ्यांनी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणावरून भरमसाठ पैसे खर्च करून पाणी योजना केल्या आहेत. त्याचा खर्च आजही लाखो रुपयांच्या घरात आहे; पण पाऊस नसल्याने तेथे ही पाणी मिळणे मुश्कील झाले आहे.
म्हैसाळ कालव्यातील डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेतून जर पाणी मिळाले तर या भागातील जनतेची पाण्यासाठीची भटकंती थांबेल, ही आशा मनात बाळगून सर्वसामान्य जनतेनेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये काहीही झाले, तर मतदान करायचे नाही, असा निर्धार केला असून, त्याला मोठ्याप्रमाणात जनतेने पाठबळ दिल्याने पाण्याचा हा संघर्ष येणाऱ्या निवडणुकीत नेत्यांना सतावणार आहे, हे निश्चित. (वार्ताहर)