विकास कामांसाठी आम्ही दोघे एकत्रच
By admin | Published: September 23, 2016 11:39 PM2016-09-23T23:39:55+5:302016-09-23T23:39:55+5:30
संजयकाका, पृथ्वीराज देशमुखांची ग्वाही : भिलवडीत विविध कामांचे उद्घाटन
भिलवडी : विकास कामांसाठी आम्ही दोघे सदैव एकत्रितच असून, भाजपच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासात आम्ही कमी पडणार नसल्याची ग्वाही खासदार संजय (काका) पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज (बाबा) देशमुख यांनी दिली.
भिलवडी (ता. पलूस) येथे आयोजित विविध विकास कामांच्या प्रारंभप्रसंगी या दोघांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. भिलवडीतील चौगुले प्लॉटअंतर्गत रस्ते, महावीरनगर रस्ता दुरूस्ती, भुवनेश्वरवाडी येथील भैरवनाथ मंदिर सभामंडप व पेव्हिंग ब्लॉक बसविणे आदी कामांचा प्रारंभ संजय पाटील व पृथ्वीराज देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला.
भुवनेश्वरी मंदिरात काका आणि बाबा एकत्रित भुवनेश्वरीदेवीचे दर्शन घेत असताना, भिलवडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रमेश पाटील यांनी, ‘आई अंबाबाई, या दोघांना सदैव एकत्रित ठेव गं आई’, असे उद्गार काढले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनीही अशीच अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आम्ही दोघे एकत्रितच असून भूतकाळातल्या गोष्टी इतिहासजमा झाल्या असल्याचे पृथ्वीराज देशमुख यांनी सांगितले. आता आम्ही दोघांनीही जिल्हा परिषद व पंचायत समित्या भाजपच्या ताब्यात आणण्याचा ध्यास घेतला असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन संजयकाका पाटील यांनी केले.
यावेळी भाजपचे पलूस तालुकाध्यक्ष विजय पाटील, पं. स. सभापती विजय कांबळे, भिलवडीचे सुरेंद्र वाळवेकर, मन्सूर मुल्ला, रमेश पाटील, धनंजय पाटील, तानाजी भोई, विजय पाटील, श्रीकांत निकम, महावीर नवले, मुन्ना पठाण, श्रीकांत सरडे, सरपंच जनार्दन साळुंखे, गजानन मोहिते, सुनील कुलकर्णी, दीपक मगदूम, प्रा. महेश पाटील, चंद्रकांत केंगार आदी उपस्थित होते.(वार्ताहर)