आम्ही मुक्कामाला आलो नाही
By admin | Published: March 10, 2016 12:02 AM2016-03-10T00:02:07+5:302016-03-10T01:18:11+5:30
सदाभाऊ खोत : आम्ही चंद्रकांतदादांसारखे शरद पवारांना गुरू तर मानले नाही...
प्रश्न : गेली अनेक वर्षे संघर्षाचे निशाण फडकवून ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्याच अजित पवारांसोबत मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर का आली ?
उत्तर : पुण्यातील कार्यक्रम राजकीय नव्हता. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदतवाटपाचा कार्यक्रम होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या ‘दिलासा यात्रे’तील कुटुंबांनाच यासाठी निवडण्यात आले होते. त्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. राष्ट्रवादी नेत्यांच्या मांडीला मांडी लावण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठीच्या एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, याचे समाधान आहे. कार्यक्रमात आम्ही कोणाचेही कौतुक केले नाही. चंद्रकांतदादांनी जसे शरद पवारांना राजकीय गुरू मानले, तसे आम्ही कोणाला गुरू तरी मानलेले नाही.
प्रश्न : तरीही मंत्रीपदासाठी हे दबावतंत्राचे राजकारण असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. ही गोष्ट खरी आहे का?
उत्तर : मंत्रीपदासाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी आम्ही कधीच राजकारण केले नाही. सत्तेत असलो तरी सरकार ज्याठिकाणी चुकेल तिथे त्यांच्यावर आम्ही टीका करणार. सत्तेत असलो म्हणून स्वाभिमान गहाण टाकलेला नाही. यापुढेही तो टाकणार नाही. घटकपक्ष म्हणून आम्ही हात बांधून गप्प बसणार नाही. आम्ही मुक्कामाला आलो नाही. पुन्हा गावाकडे परत जायचे आहे. ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या जिवावर आम्ही संघटना उभी केली आहे, त्यांना सर्व गोष्टींची उत्तरेही द्यायची आहेत.
प्रश्न : मंत्रीपदासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात का?
उत्तर : घटकपक्षांना मंत्रिमंडळात समावून घेण्याचे भाजपने यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे मंत्रीपद मिळाले तर ज्यांच्यासाठी इतका मोठा संघर्ष उभा केला, त्यांचे शासनदरबारी प्रतिनिधित्व करण्याची संधी या माध्यमातून मिळू शकते. तरीही मंत्रीपद मिळावे म्हणून आम्ही आक्रमक झालो नाही. ज्यावेळी सत्ता नव्हती त्यावेळीही आम्ही आक्रमकपणा दाखविला आहे. माझे मंत्रीपद हे शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी असेल. मिरविण्यासाठी किंवा नावापुढे मंत्रीपद चिकटविण्यासाठी आम्ही धडपडत नाही. त्यामुळे मंत्रीपदासाठी राजकारण करण्याची आम्हाला गरज नाही.
प्रश्न : पवारांसोबत तुम्ही उपस्थिती लावल्यामुळे तुमच्या निष्ठेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याचे काय?
उत्तर : राजकीय नैतिकता आणि निष्ठा आम्हाला कुणी शिकविण्याची गरज नाही. गेल्या काही वर्षात सांगली जिल्ह्यासह राज्यातील अनेक राजकारण्यांच्या निष्ठा आम्ही जवळून पाहिल्या आहेत. किती निष्ठावंत शिल्लक आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. आमची सुरुवात शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून झालेली आहे. शर्टाला लावलेला बिल्ला सरणावर गेल्यानंतरही कायम राहणार आहे. त्यामुळे आमच्या निष्ठेची चिंता कुणी करू नये. निष्ठा आणि स्वाभिमानी जपल्यामुळेच आम्ही कोणत्याही गोष्टीवर आक्रमक होऊ शकतो.
प्रश्न : तुमच्या मंत्रीपदाला स्थानिक नेत्यांचा विरोध असल्याचीही चर्चा आहे. तुमचा अनुभव काय आहे?
उत्तर : पारंपारिक जहागिरदारी असणाऱ्या आणि तसे मानून राजकारण करणाऱ्या प्रस्थापितांना आमच्यासारखा गुरं राखणारा, वारसा नसणारा माणूस मंत्री झालेला चालणारच नाही. त्यांना या गोष्टी पाहवणार नाहीत. त्यांना चांगले कधीच वाटणार नाही. तरीही अशा लोकांच्या सांगण्यावरून मंत्रीपद डावलण्याइतका भाजप हा अपरिपक्व पक्ष नाही. पक्षावर आणि विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे. मंत्रीपद मिळाले नाही, तरी आमच्या वागण्यात बदल होणार नाही. आघाडी सरकारपेक्षा आजही हे सरकार आम्हाला बरे वाटते. तरीही ज्याठिकाणी चुकीच्या गोष्टी घडतील त्याठिकाणी संघर्षाचे निशाण फडकविले जाईल. माझ्या या भूमिकेला राजू शेट्टी यांचा सह्याद्रीसारखा पाठिंबा आहे.
- अविनाश कोळी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजवर ज्यांच्याविरोधात संघर्ष केला त्याच राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासोबत पुण्यातील कार्यक्रमात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत एकत्र आल्याने राज्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. सत्तेतील घटकपक्ष असूनही खोत यांनी सरकारविरोधी सूर आळवल्याने त्यांच्या भूमिकेविषयी उलटसुलट चर्चा रंगली आहे. संघटनेची याबाबतची भूमिका, निष्ठा आणि नैतिकतेवरून उपस्थित होत असलेले प्रश्न या सर्व गोष्टींवर सदाभाऊ खोत यांच्याशी साधलेला हा थेट संवाद....