Sangli: कोणत्याच महापुरुषांची स्वागत कमान नको, बेडग ग्रामसभेत निर्णय; आंबेडकरी समाजाचा सभात्याग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:17 PM2023-08-30T12:17:34+5:302023-08-30T12:17:53+5:30
पुन्हा संघर्षाची चिन्हे, कमान पाडल्याने आंबेडकरी समाजातर्फे बेडग ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता
मिरज : बेडग (ता. मिरज) येथे स्वागत कमानीच्या वादाबाबत मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत गावात जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी कोणत्याच महापुरुषांची कमान बांधण्यात येऊ नये, असा ठराव बहुमताने करण्यात आला. या निर्णयाविरुद्ध आंबेडकरी समाजाने सभात्याग केला. या निर्णयामुळे पुन्हा संघर्षाची चिन्हे असून, याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आंबेडकरी समाजाने दिला आहे.
बेडग येथे बांधकाम सुरू असलेली कमान ग्रामपंचायतीने पाडल्याने आंबेडकरी समाजातर्फे बेडग ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमान पाडणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून प्रशासनातर्फे स्वागत कमान पुन्हा बांधण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानुसार गावात स्वागत कमान उभारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसभेत ठराव घेण्याच्या सूचना बेडग ग्रामपंचायतीला दिल्या होत्या.
गावात स्वागत कमानीवरून तेढ निर्माण झाले होते. त्यामुळे या ग्रामसभेतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष होते. जिल्हा परिषदेच्या सूचनेने बेडग येथे मंगळवारी ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत गावातील २२२९ पुरुष व महिला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. ग्रामसेवक सुनील कोरे यांनी मागील इतिवृत्ताचे वाचन केले. यावेळी गावात स्वागत कमान उभारण्यास परवानगी द्यावी की नाही याबाबत ठराव घेण्यात आला.
या ठरावावर गावात कोणत्याही महापुरुषांची स्वागत कमान बांधण्यास परवानगी देऊ नये. या ठरावाच्या बाजूने दोन हजारांवर ग्रामस्थांनी हात उंचावून मतदान केल्याने हा ठराव बहुमताने मंजूर झाला. गावात फक्त ग्रामदैवत मरगाई देवीची कमान व्हावी व गावात महापुरुषांच्या नावाने एक अभ्यासिका करण्यात यावी, असा ठराव मंजूर करण्यात आला.
स्वागत कमान बांधकामास परवानगी नाकारण्याच्या निर्णयामुळे ग्रामसभेस उपस्थित आंबेडकरी समाजाने सभात्याग केला. ग्रामसभेच्या ठरावाचा आंबेडकरी समाजातर्फे डाॅ. महेशकुमार कांबळे यांनी निषेध केला. याविरोधात दि. १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही डाॅ. कांबळे यांनी सांगितले.
माेठा पोलिस बंदाेबस्त
ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. ग्रामसभेस आलेल्या ग्रामस्थांना ओळखपत्र पाहून प्रवेश देण्यात आला. सभेस ग्रामसेवक सुनील कोरे, गटविस्तार अधिकारी सदाशिव मगदूम, तलाठी मनोहर माळी, सहायक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, भगवान पालवे, गणेश कोकाटे, रवींद्र भापकर, सरपंच उमेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.