आम्ही ठरवलंय, यंदा लढणारच! : सम्राट महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:37 PM2019-06-13T23:37:34+5:302019-06-13T23:38:16+5:30
‘आम्ही ठरवलंय...’ असे सांगत महाडिक युवा शक्तीचे संस्थापक सम्राट महाडिक यांनी, भाजप-शिवसेनेच्या युतीची उमेदवारी मिळो अथवा न मिळो, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. यासाठी शिराळा शहरात संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, जाहीर सभेचे नियोजन रविवार
विकास शहा ।
शिराळा : ‘आम्ही ठरवलंय...’ असे सांगत महाडिक युवा शक्तीचे संस्थापक सम्राट महाडिक यांनी, भाजप-शिवसेनेच्या युतीची उमेदवारी मिळो अथवा न मिळो, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. यासाठी शिराळा शहरात संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, जाहीर सभेचे नियोजन रविवार, दि. १६ रोजी केले आहे.
या मतदारसंघात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जरी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने निवडून आले असले तरी, विधानभेच्या या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. त्यातच आधीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे आम्हालाच हा मतदारसंघ पाहिजे, अशी खेळी शिवसेनेने सुरू केली आहे. आता खासदारकी शिवसेनेकडे आल्याने या मागणीने जोर धरला आहे.
या तिघांबरोबर आता सम्राट महाडिक यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. वाळवा तालुक्यातील ४८ गावांमध्ये संपर्कासाठी पेठनाका येथे त्यांचे कार्यालय आहे. आता शिराळा तालुक्यातील नागरिकांसाठी संपर्क कार्यालय रविवारी सुरू होत आहे.
याबाबत सम्राट महाडिक यांनी सांगितले की, नागरिकांचे खासगी, शासकीय कार्यालयातील, सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी येथे कार्यालय सुरू करत आहे. तालुका कार्यकारिणी, वनश्री नानासाहेब महाडिक महिला पतसंस्थेच्या संचालक मंडळाची घोषणा होणार आहे. सभेत आमची वाटचाल समजेल आणि संभ्रमावस्था दूर होईल. आम्ही मागील विधानसभा, लोकसभा, पंचायत समिती-जिल्हा परिषद निवडणुकीत युतीचे काम केले आहे. मात्र आज आमची उमेदवारी कोणत्याही पक्षाशी निगडित नाही. उमेदवारी मिळाली तर ठीक, नाही तर एकटेच निवडणुकीस सामोरे जाऊ. यावेळी जयसिंगराव शिंदे, केदार नलवडे, विद्या पाटील, रामचंद्र जाधव, सुमित पाटील यांनीही महाडिक यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले.
सर्वत्र डिजिटल झळकू लागले...
सम्राट महाडिक यांनी युतीची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा ठेवली आहे. याचबरोबर नाईक, देशमुख यांना अनेक निवडणुकीत नानासाहेब महाडिक यांनी मदत केली आहे. त्यामुळे यावेळी या मंडळींनी आपणास मदत करावी, अशी अपेक्षा ठेवली आहे. मात्र काहीही होवो, ‘आम्ही ठरवलंय...’चे डिजिटल मतदार संघात झळकू लागले आहे.