घासावरही कर लावताय? सामान्यांनी जगायचे कसे?, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 01:12 PM2022-07-27T13:12:43+5:302022-07-27T13:13:20+5:30
केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी एकीची वज्रमूठ आवळावी लागेल
इस्लामपूर : भाजपचे केंद्र सरकार, सामान्य माणसाच्या प्रत्येक घासावर कर लावत असेल, तर सामान्य माणसाने जगायचे कसे? आता स्वस्थ बसून चालणार नाही. केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी एकीची वज्रमूठ आवळावी लागेल, अशी भावना माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
आंबेडकरनगर येथे शहरी आरोग्य केंद्र उभारून शहरातील नागरिकांना सुलभ व स्वस्त आरोग्य सुविधा देत आहोत. शहरात वेगवेगळ्या भागात आणखी तीन आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळविली असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, केंद्र सरकारने कपड्यावर कर आकारला. अलीकडे त्यांनी अन्नधान्यावर ५ टक्के जीएसटी आकारला आहे. सामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आहे.
येथील बेघर वसाहत, मॉडर्न हायस्कूल, सिध्देश्वर मंदिर, पोतदार हॉल व माळी गल्ली येथील संवाद बैठकीमध्ये ते बोलत होते. युवा नेते प्रतीक पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, ॲड. चिमण डांगे, खंडेराव जाधव, सुभाषराव सूर्यवंशी, दादासाहेब पाटील, ॲड. धैर्यशील पाटील उपस्थित होते.
यावेळी माजी नगरसेवक डॉ. संग्राम पाटील, माजी नगरसेविका जयश्री माळी, केदार पाटील, प्रणव जाधव, हर्षवर्धन मोहिते यांचीही भाषणे झाली. प्रा. शामराव पाटील, बाळासाहेब पाटील, शंकरराव पाटील, ॲड. संपतराव पाटील, आनंदराव पाटील उपस्थित होते.