डोळसपणे पाहायला शिकविणारे शिक्षण हवे

By Admin | Published: December 28, 2015 11:55 PM2015-12-28T23:55:51+5:302015-12-29T00:56:38+5:30

नागनाथ कोत्तापल्ले : सांगलीत तीनदिवसीय ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन

We need education that teaches us to be blind | डोळसपणे पाहायला शिकविणारे शिक्षण हवे

डोळसपणे पाहायला शिकविणारे शिक्षण हवे

googlenewsNext

सांगली : वाचनातून जिज्ञासा निर्माण होते आणि जिज्ञासेतून प्रश्न निर्माण होतात. निर्माण झालेले प्रश्न विचारायला लावणारी आणि जगाकडे डोळसपणे पाहायला शिकविणारी शिक्षण पद्धती अस्तित्वात हवी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत तीन दिवसांच्या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन केले आहे. सांगलीतील सैनिक शाळेच्या सभागृहात सोमवारी याचे उद्घाटन कोत्तापल्ले यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कोत्तापल्ले म्हणाले की, ठराविक विचारसरणीच्या लोकांना कोणीही प्रश्न विचारलेले चालत नाहीत. आम्ही सांगतो तेच खरे मानले पाहिजे, असे त्यांचे मत असते. प्रश्न विचारणे हा त्यांच्यादृष्टीने गुन्हा असतो. वास्तवात जगाच्या पाठीवर ज्यांनी-ज्यांनी प्रश्न विचारले, त्यांना ज्ञान प्राप्त झाले. मुलांनी शिक्षकांना प्रश्न विचारून हैराण केले पाहिजे. ही क्षमता प्राप्त करायची असेल, तर मुलांनी अन्य साहित्य वाचले पाहिजे. सध्याच्या शिक्षण पद्धतीत अनेक शिक्षकांना मुलांनी प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. मुलांनी शांतपणे ऐकून केवळ शिक्षकांच्या सूचनेप्रमाणे कृती केलेली आवडते. मुलांच्या मनात प्रश्न निर्माण झाल्याशिवाय त्यांना खरे ज्ञान प्राप्तच होणार नाही. प्रश्न पडल्यामुळेच न्यूटन घडला, प्रश्न पडल्यानेच वाफेवरचे इंजिन निर्माण होऊ शकले. जगातील बहुतांशी संशोधनाचे मूळ हे प्रश्न निर्माण होण्यातच आहे. जगाकडे डोळे उघडून पाहायला शिकविणारी शिक्षण पद्धती असायला हवी. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंनी शिक्षणाला सुरुवात केली नसती, तर आजचे चित्र वेगळे दिसले असते. स्त्रियांना शिक्षण का देता येत नाही, यासाठी धर्मग्रंथांचे दाखले त्यावेळचे लोक देत होते. तरीही जगाकडे डोळसपणे पाहिल्यानंतर फुलेंनी शिक्षणाला सुरुवात केली.
ग्रंथांचा पसारा पाहिला, तर कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संपूर्ण आयुष्यात सर्वच ज्ञान प्राप्त करता येत नाही. तरीही ग्रंथ वाचनातून काळावर आणि भौगोलिक स्थितीवर मात करता येते. एका पुस्तकातून हजारो वर्षांची सफर आपल्यास करता येते. दाही दिशांचे ज्ञान पुस्तकातून प्राप्त होऊ शकते. त्यामुळे ग्रंथांचे वाचन विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. गौतमीपुत्र कांबळे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मधुकर यादव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नीशादेवी वाघमोडे, आबासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाषण थांबले...
विद्यार्थी व शिक्षकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. कोत्तापल्ले यांच्या भाषणावेळी संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते. शेवटी काही शाळांच्या मुलांना सभागृहातून ग्रंथ प्रदर्शन पाहण्यासाठी बाहेर नेण्यात आले. गर्दी वाढल्यामुळे काही वेळ कोत्तापल्ले यांना भाषण थांबवावे लागले. बैठक व्यवस्थेचे नियोजन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणास सुरुवात केली.

Web Title: We need education that teaches us to be blind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.