महाराष्ट्र-कर्नाटक शासनाच्या समन्वयातून महापुरावर नियंत्रण ठेवू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:05+5:302021-06-24T04:19:05+5:30
मिरज : पश्चिम महाराष्ट्राची संभाव्य महापुराच्या धोक्यापासून सुटका करण्यासाठी अलमट्टीतील पाण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याने आमदार सुरेश खाडे यांच्यासह ...
मिरज : पश्चिम महाराष्ट्राची संभाव्य महापुराच्या धोक्यापासून सुटका करण्यासाठी अलमट्टीतील पाण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याने आमदार सुरेश खाडे यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी अथणी येथे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची भेट घेतली. राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या समन्वयातून ही समस्या सोडविण्याची हमी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी यावेळी दिली. संभाव्य महापुराबाबत कर्नाटक शासनाकडून सकारात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन खाडे यांना दिले.
कोरोनाचा सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्राला बसल्याने या भागातील अर्थकारण कोलमडले आहे. अशातच महापुराची आपत्ती उद्भवल्यास जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य महापूर टाळण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्याशी चर्चा केली आहे. यानंतर आमदार सुरेश खाडे यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची भेट घेऊन समन्वय ठेवण्यासाठी चर्चा केली. महापुराबाबत कर्नाटक-महाराष्ट्र शासनाने समन्वयातून मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री सवदी यांची भेट घेतल्याचे खाडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, राज्यात महाआघाडी व कर्नाटकात भाजपचे शासन असल्याने राजकारण बाजूला ठेवून हा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांना योग्य त्या सहकार्याची भूमिका घेऊ. शिवाय कर्नाटकातील शासनाबरोबर योग्य समन्वय राखण्यासाठीही आग्रही राहू. महापुराचा फटका बसणाऱ्या मतदारसंघाचा मी आमदार असल्याने महापूराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आग्रही राहणार आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना राजकारण बाजूला ठेवून करावा लागणार आहे. उपमुख्यमंत्री सवदी यांच्या भेटीतून महापूर टाळण्यासाठी योग्य मार्ग निघेल, अशी अशा आहे. सांगली जिल्ह्यात महापुराच्या पाण्यातून जत, कवठेमहांकाळ, आटपाडी या दुष्काळी भागांतील धरणे भरावीत यासाठीही पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.
यावेळी भाजप अनुसूचित मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे, ॲड. विलास कौलगुड, सुहास कौलगुड, सागर वडगावे, विनायक बागडी उपस्थित होते.