एसटीतील बदल्या, सेवा स्थगिती कर्मचाऱ्यांना न्याय देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:20 AM2020-12-27T04:20:07+5:302020-12-27T04:20:07+5:30
एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबात एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबईत परिवहन मंत्री ॲड. परब यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र एसटी ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबात एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबईत परिवहन मंत्री ॲड. परब यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते तथा पक्ष प्रवक्ते खा. अरविंद सावंत, सरचिटणीस हिरेनजी रेडकर उपस्थित होते. यावेळी रेडकर यांनी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील एसटीच्या विभागातील कर्मचारी अतिरिक्त असल्याच्या नावाखाली त्यांच्या बदल्या केल्या आहेत. या अन्यायकारक झालेल्या बदल्या रद्द करून सेवा स्थगिती उठविण्यासाठी संयुक्त निवेदन दिले. सांगली, सातारा व कोल्हापूर वगळता इतर कोणत्याही विभागात असा प्रकार घडलेला नसताना फक्त या तीनच विभागांत हा प्रकार घडला आहे. ऐन कोरोना संसर्गाच्या प्रसाराने राज्यात थैमान घातले होते, त्याचवेळी या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यामुळे माणुसकीला काळिमा फासणारी घटना या तीन विभागांत घडल्याचे परिवहन मंत्री परब यांच्या निदर्शनास आणून दिले. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊन लवकरच न्याय देण्याचे परिवहन मंत्र्यांनी मान्य केले. त्यामुळे सांगली, सातारा व कोल्हापूर विभागातील अन्यायी बदली झालेल्या आणि सेवा समाप्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार आहे.