शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊ, शरद पवार यांचे कृती समितीला आश्वासन
By अशोक डोंबाळे | Published: July 8, 2024 05:58 PM2024-07-08T17:58:13+5:302024-07-08T17:59:30+5:30
शेतकऱ्यांची बाजू जाणून घेतल्यानंतर शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला
सांगली : पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नाबाबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. शक्तिपीठ प्रश्नाबाबत शेतकऱ्यांच्या सोबत मी असेल, असे आश्वासन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी 'शक्तिपीठ' शेती बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
सांगलीत आज, सोमवारी खासदार शरद पवार आले होते. यावेळी ‘शक्तिपीठ’ शेती बचाव कृती समितीचे नेते आणि किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख, सतीश साखळकर, सांगली बाजार समितीचे संचालक संग्राम पाटील, शेतकरी कामगार जिल्हाध्यक्ष दिगंबर कांबळे, प्रवीण पाटील, उमेश एडके आदी उपस्थित होते. उमेश देशमुख, दिगंबर कांबळे, सतीश साखळकर यांनी शक्तिपीठ महामार्गामुळे जिल्ह्यातील मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील १९ गावातील हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
शेतकऱ्यांची बाजू जाणून घेतल्यानंतर शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. मी सांगलीत आलो असून शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांना भूमिहीन व्हावे लागत आहे. या शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊन निर्णय घ्यावा, अशी सूचना केली. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी विष्णू पाटील, अधिक पाटील, अनिल पाटील, रघुनाथ पाटील, सुधाकर पाटील, मुरलीधर निकम, अमर पाटील, दत्तात्रय पाटील, मयूर पाटील, दिनकर श्रीकांत पाटील, जयप्रकाश पाटील, गजानन सावंत, प्रकाश टकले, एकनाथ कोळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
महापुराचा धोका
शक्तिपीठ महामार्गासाठी मिरज तालुक्यातील कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी गावे बाधित होणार आहेत. कृष्णा नदीवर मोठा पूल होणार असून त्यास मोठ्या प्रमाणात भराव पडणार आहे. कर्नाळ ते कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील गावांपर्यंत भराव पडल्यास पावसाळ्यात कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर आल्यानंतर ते लवकर हटणार नाही. पाऊस मोठा झाल्यास महापुराचा मोठा धोका नदीकाठच्या गावांसह सांगली, मिरज शहरांना आहे. म्हणूनच शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्याकडे केली.