शेतकरी संघटनेच्या नेत्यांची ताकद कळणार-: शिराळा मतदार संघात समीकरणे बदलली, माने गटाच्या भूमिकेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 12:22 AM2019-03-16T00:22:30+5:302019-03-16T00:27:11+5:30
विकास शहा । शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघात ऊस आंदोलनाच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खा. राजू शेट्टी यांनी भक्कमपणे ...
विकास शहा ।
शिराळा : शिराळा विधानसभा मतदारसंघात ऊस आंदोलनाच्या माध्यमातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खा. राजू शेट्टी यांनी भक्कमपणे पाय रोवले आहेत. यावेळी काँग्रेस आघाडीच्या पाठिंब्यामुळे या मताधिक्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जर खा. शेट्टी, रयत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील ही त्रिमूर्ती मैदानात उतरली तर, शेतकरी संघटनेच्या या प्रमुखांची स्वत:चीशक्ती दिसून येणार आहे.
गेल्यावेळच्या निवडणुकीत शेट्टी यांच्या पाठीशी असणारे आ. शिवाजीराव नाईक आता त्यांच्याविरोधात आहेत. शिवसेना-भाजप युतीमुळे आ. नाईक, खोत व शिवसेनेचे इच्छुक धैर्यशील माने यांच्यामध्ये बैठका सुरू आहेत. महाआघाडी झाली तर गतवेळचे खा. शेट्टी यांचे विरोधक जयंत पाटील, माजी आ. मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख यांना शेट्टींच्या पाठीशी उभे रहावे लागेल. युतीने खोत यांना उमेदवारी दिल्यास परिस्थिती बदलणार आहे.
भाजप युतीतील निशिकांत पाटील, सदाभाऊ खोत, शिवाजीराव नाईक, सम्राट महाडिक यांच्यातील मतभेद आघाडीला घातक ठरण्याची शक्यता आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आघाडी शक्ती पणाला लावेल.
शिराळा व वाळवा पंचायत समितीवर काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. याचा फायदा महाआघाडीच्या उमेदवारास होईल. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शिराळा विधानसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील ४९ गावांवर मजबूत पकड आहे. गेल्या निवडणुकीत तेथे शेट्टी यांनी चांगले मतदान मिळवले. यंदा शेट्टी यांना जयंत पाटील यांची साथ त्यांना मिळणार आहे.
शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनीही उमेदवारी घोषित केली आहे.
लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम असणार आहे. मानसिंगराव नाईक यांची सहकार संस्थांवर पकड मजबूत असून, या तुलनेत शिवाजीराव नाईक यांची पिछेहाट झाली आहे. सत्यजित देशमुख यांनी कॉँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. सत्यजित यांना कॉँग्रेसने विधानसभेवेळी संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. वाळव्यातून सम्राट महाडिक यांची उमेदवारी प्रस्थापित नेत्यांना डोकेदुखी ठरणारी आहे. त्यामुळे सर्व नेतेमंडळींना कसरत करावी लागणार आहे.
शिराळा विधानसभा मतदारसंघ
एकूण मतदार - २ लाख ९० हजार १४१
पुरुष मतदार - १ लाख ४९ हजार २२७
स्त्री मतदार - १ लाख ४० हजार ९१३
तृतीयपंथी - १
गत निवडणुकीत शिराळा मतदारसंघातील चित्र
राजू शेट्टी - १ लाख १ हजार ७६३
कल्लाप्पाण्णा आवाडे- ८८ हजार २०२
मताधिक्य - १३५६१