कवलापूर विमानतळाविषयी लवकरच निर्णय घेऊ - ज्योतिरादित्य सिंधियांचे आश्वासन; सांगलीतील भाजप नेत्यांशी चर्चा
By अविनाश कोळी | Published: February 28, 2023 03:48 PM2023-02-28T15:48:32+5:302023-02-28T15:49:16+5:30
अनेक वर्षांपासून ही जागा विमानतळासाठी आरक्षित
सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे विमानतळ तसेच अनुषंगिक उद्योग उभारणीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजप नेत्यांना दिले.
कोल्हापूर येथे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सांगलीतील भाजपचे नेते मकरंद देशपांडे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी सिंधिया यांची भेट घेतली. सिंधिया यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सांगलीपासून जवळच असलेल्या कवलापूर येथे विमानतळासाठी ६० वर्षांपूर्वी १६० एकर जागा आरक्षित केली होती. या जागेवर धावपट्टीसाठी ही जागा आरक्षित होती. अनेक वर्षांपासून ही जागा विमानतळासाठी आरक्षित ठेवली आहे. मात्र अद्याप त्याठिकाणी विमानतळ झालेले नाही. सध्या ही जागा औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात आहे.
ही जागा काही कारणासाठी एका खासगी कंपनीस विकण्याचा तसेच विकसित करण्याचा प्रस्ताव आला होता. त्यास सांगलीकरांनी विरोध केला. या जागेवर विमानतळच व्हावे, अशी जनतेतून मागणी आहे.
आणखी काही जमीन अधिग्रहण करून व ‘उडान’ या महत्वपूर्ण प्रकल्पांतर्गत विमानतळ करण्यात यावे. विमानतळ उभारणी बरोबरच पूरक उद्योग, अवकाश, क्षेपणास्त्रे आणि विमानतळांशी संबंधित उद्योग विकसित होऊ शकतात. त्यामुळे सांगली जिल्ह्यात रोजगार निर्मिती होऊ शकते. या मागण्यांना सिंधिया यांनी प्रतिसाद देत कवलापूरच्या जागेची तातडीने पाहणी करुन योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन यावेळी दिले.